स्नेहा पावसकर
ठाणे : ठाण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनासोबत डॉक्टरांचा ‘ठाणे कोविड टास्क फोर्स’ काम करीत असून त्याचे कोआॅर्डिनेटर डॉ. संतोष कदम हे कोरोनाला हरवून पुन्हा एकदा रुग्णसेवेकरिता सज्ज झाले आहेत.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध बैठका, वेबिनार घेण्याबरोबरच स्वत:ची प्रॅक्टिस करतानाच डॉ. कदम स्वत: कोविड पॉझिटिव्ह झाले. मात्र खरेखुरे कोरोना योद्धा असल्याने ते कोरोनाला हरवून पुन्हा परतलेत आहेत. आतापर्यंत ठाणे शहरातील सुमारे ६० डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाले असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला. उर्वरित सर्व बरे झाले. यांच्यापैकीच एक आणि इंडियन मेडिकल असोसिएशन ठाण्याचे सेक्रेटरी डॉ. कदम एप्रिलपासून १०-११ डॉक्टरांच्या ठाणे कोविड टास्क फोर्ससह महापालिका प्रशासनासोबत काम करीत आहेत. डॉ. कदम यांनी कोआॅर्डिनेटर म्हणून डिस्चार्ज गाइडलाईन ठरवणे, कोणते हॉस्पिटल कोविडसाठी योग्य आहे हे ठरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. शहरातील १७ खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल निश्चित करण्यात या टास्क फोर्सचा मोठा वाटा आहे. तसेच कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात डॉक्टरांनाही मास्क, ग्लोव्ज, पीपीई कीट, सॅनिटाझर पुरेसे उपलब्ध होत नव्हते. डॉ. कदम यांनी अतिशय अल्पदरात थेट फॅक्टरीतूनच या वस्तू उपलब्ध केल्या. फोर्सने महाराष्ट्र टास्क फोर्ससोबत मिळून डॉक्टरांसाठी एक वेबिनार ५ जूनला आयोजित केला होता. मात्र याचदरम्यान त्यांना त्रास जाणवल्याने ते स्वत: कोविड पॉझिटिव्ह आले. परंतु तशा परिस्थितीतही घरातूनच वेबिनारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्रास वाढल्याने रूग्णालयात दाखल होऊन त्यांनी उपचार घेतले. १३ जूनला डॉ. कदम यांना डिस्चार्ज मिळाला.कोरोना कोणालाही होऊ शकतो, फक्त योग्य ती काळजी घेतली तर नक्की बरा होतो. माझ्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सामान्य रूग्णांसोबतच सोसायटीत, परिचयातील, सहकारी डॉक्टरांपैकी कोणी कोविडसदृश्य आढळल्यास त्यांना मार्गदर्शनाबरोबरच उपचारार्थ रूग्णालयात अॅडमिट व्हायला मदत करतो, त्यांना मानसिक आधार देतो, डॉक्टर या नात्याने ते माझे कर्तव्य आहे. ते करीत राहीन. ठाण्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनासोबत मिळून कामही करीत राहू. - डॉ. संतोष कदम, कोआॅर्डिनेटर, ठाणे कोविड टास्क फोर्स