ठाणे : मुंबई महापालिकेपेक्षा अधिक मानधन देण्याची तयारी दर्शवूनही ग्लोबल कोविड रुग्णालयात डॉक्टरभरतीसाठी १० वेळा जाहिरात देण्याची नामुश्की ठाणे महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. मात्र, काही प्रमाणात डॉक्टर आणि परिचारिकांची पदे भरल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
ठाणे महापलिकेच्या क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. बुधवारीदेखील ३२७ नवीन रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता १६ हजार ५४२ इतकी झाली आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे महापालिकेने कंत्राटी पद्धतीने डॉक्टर आणि परिचारिकांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. या भरतीसाठी इच्छुकांनी पालिका मुख्यालयात हजेरी लावली होती. यामध्ये केवळ वॉर्डबॉयच्या पदांसाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली होती. यातून सुमारे एक हजार ९६३ जागांची १५ प्रकारच्या पदांची भरती केली जाणार आहे.
परंतु, कोरोनाच्या भीतीने आणि कंत्रांटी पद्धतीने ही भरती असल्यामुळे अनेक डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनीही या भरतीकडे पाठ फिरविल्याचे आढळून आले आहे. मुंबई महापालिकेपेक्षा अधिक मानधन देण्याचीही तयारी महापालिका प्रशासनाने दर्शविली. तरीही, या भरतीकडे एमडी आणि एमबीबीएस डॉक्टरांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आतापर्यंत १० वेळा डॉक्टरांच्या जागांसाठी पालिकेला जाहिरात द्यावी लागली.
‘बीडीएस अर्हताधारकांचाही उल्लेख असावा’
ठाणे महापालिकेने काढलेल्या पदभरतीच्या जाहिरातीमध्ये बीडीएस अर्हताधारक डॉक्टरांचाही उल्लेख करावा, असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. महापालिकेने डॉक्टरांसह इतर पदांसाठी दिलेल्या जाहिरातीत एमबीबीएस डॉक्टरांचाच उल्लेख केला आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेला डॉक्टरांची कमतरता भासत आहे.
क्वारंटाइन सेंटर, हॉटस्पॉट अशा ठिकाणी डॉक्टरांचीच गरज असते. मात्र, सद्य:स्थितीत डॉक्टर्स मिळत नसल्याने बीडीएस अर्हताधारक डॉक्टर्स घ्यावेत, असे शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन बीडीएस अर्हताधारक डॉक्टर्स महापालिकेने घेतले, तर त्याचा निश्चित फायदा होईल, असेही महापौरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.