अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीमध्ये असलेल्या विजय केअर सेंटरमध्ये बिल न दिल्याने एका महिलेचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयाने नकार दिला. येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याने रुग्णालयात गोंधळ घालत तो मृतदेह स्वतः उचलून त्यावर अंत्यसंस्कार केला.
अंबरनाथमध्ये एमआयडीसी भागात विजय कोवीड केअर सेंटर असून या सेंटर मध्ये बदलापूरच्या रहिवासी असलेल्या मीरा बनकर या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसापासून ही महिला मृत्युशी झुंज देत होती. अखेर आज सकाळी साडेसात वाजता तिचा मृत्यू झाला, याची कल्पना मृत महिलेच्या मुलांना देण्यात आली. मृत महिलेची मुलगी आणि मुलगा या दोघांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात केले असता जोपर्यंत बिल भरत नाही, तोपर्यंत मृतदेह न देण्याचा निर्णय तेथील डॉक्टरांनी घेतला. अखेर याप्रकरणी कोणताही तोडगा निघत नसल्याने ही दोन्ही मुले डॉक्टरांच्या भूमिकेमुळे स्तब्ध झाली होती.
अखेर, या प्रकरणाची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच मनसेचे जिल्हा उपसंघटक शैलेश शिर्के यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेत रूग्णालय प्रशासनाला मृतदेह देण्यास सांगितले. मात्र, या रुग्णालय प्रशासनाने अरेरावीची भाषा करीत मृतदेह न देण्याचा अट्टाहास कायम ठेवला. त्यावरून रुग्णालयातील कर्मचारी आणि मनसे पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाले आणि त्यानंतर हात हातापाई झाली. यावेळेस चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. हा सर्व राडा झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने नमते घेत मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयातील कोणत्याच कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला हात न लावल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मृतदेह उचलून शववाहिनीत आणले. एवढेच नव्हे तर बदलापूरच्या स्मशानभूमीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार देखील केले