अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी सध्या विविध सर्व्हेच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे पालिका मुख्यालयासह प्रभाग समितीत देखील अधिकाºयांची कमतरता जाणवत आहे. त्यात आता महापालिकेच्या काही प्रभाग समितींना अद्यापही सहाय्यक आयुक्तच मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. तर काही सहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर दोन दोन प्रभाग समित्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
ठाणे महापलिका क्षेत्रातील लोकसंख्या सध्याच्या घडीला २५ लाखाच्या आसपास आहे. तर, घोडबंदर येथील ओवळापासून सुरु होवून थेट मुंब्रा शिळरोड पर्यंत पालिका क्षेत्राचा विस्तार झाला आहे. त्यामुळे प्रत्येक ठाणेकर नागरिकाला त्यांचे काम घेवून, ठाणे पालिका मुख्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नये याकरिता, कळवा, दिवा, मुंब्रा, नौपाडा-कोपरी, वागळे इस्टेट, लोकमान्य - सावरकर, उथळसर, वर्तकनगर आणि माजीवाडा- मानपाडा प्रभाग समितीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रभाग समितीच्या माध्यमातून नागरिकांचे पाणी बिल, मालमत्ता कर वसूल करणे, जन्म मृत्यू नोंदणी, अतिक्रमण विभाग आदी विविध विभागाच्या अम्ध्याम्तून नागरिकांना सेवा पुरविण्यात येत असतात. यावर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येत असते.
दरम्यान, ठाणे पालिकेत १८ सहाय्यक आयुक्तांची मंजूर पदे आहेत. यापैकी ठाणे पालिकेचे सहा आणि शासनाकडील दोन अशी आठ सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. यांमुळे अनेक सहाय्यक आयुक्तांवर त्यांच्यावर असलेल्या विभागासह अन्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामध्ये सचिन बोरसे यांच्याकडे निवडणूक विभागासह कळवा प्रभाग समितीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर, अक्षय गुडदे यांच्याकडे स्थावर मालमत्ता विभागासह दिवा प्रभाग समितीचा, महेश आहेर यांच्याकडे उथळसर सह अतिक्रमण विभागाचा तसेच प्रीतम पाटील यांच्याकडे माजिवाडा प्रभाग समितीसह क्लस्टर विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.