कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळेचे काही निर्बंध लादलेले आहेत. या निर्बंधांमध्ये अन्य ठिकाणी वेळेची मर्यादा ही कमी ठेवली आहे. मात्र, बारची वेळ रात्री ११ पर्यंत ठेवण्यात आली आहे. बारमध्ये काय, ११ नंतर कोरोना येतो का, असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
आमदार पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली आहे की, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सगळ्यात जास्त चाकरमानी वर्ग राहतो. जो मुंबईला पोटापाण्यानिमित्त नोकरीस जातो. तो कामावरून संध्याकाळी येतो. तो घरी पोहाेचण्याआधीच ७ वाजता दुकाने बंद झाली तर त्याने त्याला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी कधी करायची, असा प्रश्न आहे. एकीकडे दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली राहणार, असे म्हणणाऱ्या पालिकेने बारला रात्री ११ वाजेपर्यंत सूट दिली आहे, याकडे आ. पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
राज्य सरकारकडे कोरोना एक्झिट प्लानच नाही. सुरुवातीला कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हा आरोग्य यंत्रणा अपुरी होती. कोट्यवधींचा खर्च करून आरोग्य यंत्रणा उभी केली गेली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कार, रिक्षाचालकांचे लसीकरण प्राधान्याने केले पाहिजे, याकडे आ. पाटील यांनी लक्ष वेधून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना ट्विट केले आहे.
टोलनाक्याचे कंत्राट संपल्याने वसुली बंद
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील काटई व कोन या टोलनाक्यांवरील कंत्राट संपुष्टात आल्याने राज्य सरकारने टोलवसुली बंद केली आहे. याचे श्रेय खासदार घेत असल्याची टीकाही आमदारांनी केली आहे. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामास मंजुरी देताना सरकारने या रस्त्यावरील टोल २०३१ पर्यंत सुरू राहणार, असे म्हटले होते. त्यामुळे दोन्ही नाके कायमचे बंद केले आहे की रस्त्याचे काम सुरू झाल्यावर पुन्हा टोलवसुली सुरू केली जाईल, याविषयी पत्रात राज्य रस्तेविकास महामंडळाने सुस्पष्ट केले नसल्याकडे त्यांनी बोट ठेवले आहे.
----------------------