लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध भागात तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी आरोग्य विभागाकडून डॉक्टरांची टीम उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र ग्रामीण भागात असलेली सार्वजनिक वाहतुकीची कमतरता, शहरी आणि ग्रामीण भागात डॉक्टरांच्या वेतनात तफावत आदी कारणांमुळे डॉक्टर त्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. कोरोना काळात ३३ डॉक्टरांची नियुक्ती केली होती; परंतु अवघ्या १७ डॉक्टरांनी कामाच्या ठिकाणी हजेरी लावली असून उर्वरितांनी नकार घंटा वाजविली आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना या आजाराने शिरकाव केला. अचानकपणे आलेल्या या महामारीने आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली होती. ही आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली. कोरोनाकाळात जिल्ह्यातील विविध शहरी भागात तसेच ग्रामीण भागातील शहापूर, मुरबाड आणि कल्याण वरप येथील ग्रामीण भागासाठी एमबीबीएस आणि बीएएमएस आशा ३३ डॉक्टरांना नियुक्तीपत्रे दिली होती. त्यापैकी केवळ १७ डॉक्टर कर्तव्यावर हजर झाले आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यासाठी तीन एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केली. त्यापैकी केवळ एकच डॉक्टर हजर झाले, तर सहा बीएएमएस डॉक्टरांपैकी तीन डॉक्टर कर्तव्य बजावात आहेत. शहापूर तालुक्यासाठी एका एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केली. तो ही डॉक्टर हजर झाला नाही. तर तीन बीएएमएस डॉक्टरांपैकी एक डॉक्टर कर्तव्य बजावत आहे. त्यात कल्याण वरप येथे एक एमबीबीएस डॉक्टराची नियुक्ती केली. तेही हजर झाले नाहीत तर, बीएएमएस दोन डॉक्टरांपैकी केवळ एक डॉक्टर कर्तव्य बजावत आहे.
कोरोनाकाळातील एकूण नियुक्त्या -३३
एमबीबीएस नियुक्ती - १०
हजर झाले किती - ६
बीएएमएस, बीडीएस - २३
हजर झाले किती - ११
व्यवस्थाही नाही, अन् पगारही नाही
शहरी भागात म्हणजे महापालिकांच्या ठिकाणी जास्तीचा पगार दिला जात आहे. परंतु ग्रामीण भागात नियुक्तीनंतर कमी पगार मिळत आहे. त्यातही येण्या-जाण्याची अडचण असल्याने नियुक्ती होऊनही गेलो नाही.
(एक डॉक्टर)
ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनाकडून डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या वेतनात यातील तफावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गेलो नाही.
(एक डॉक्टर)
कारणे काय?
महापालिकांच्या तुलनेत ग्रामीण भागासाठी पगार तुटपुंजा दिला जात आहे. तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आहे. शिवाय शहरात वास्तव्यास असल्याने येण्या जाण्यासाठी जो काही वेळ लागतो, त्यामुळेदेखील जाण्यास नकार दिला जात आहे. तसेच इतर सोयीसुविधा देखील ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही. ही काही महत्त्वाची कारणे पुढे आली आहेत.
ग्रामीण भागात एकूण किती जागा रिक्त
केवळ ग्रामीण भागाचा विचार केल्यास या ठिकाणी १६ डॉक्टरांची नियुक्ती कोरोनाकाळात केली होती, परंतु त्यातील अवघ्या सहा डॉक्टरांनीच जाण्यास पसंती दिली असून १० जागा येथील आजही रिक्त आहेत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या महासभेत देखील याविरोधात ग्रामीण भागातील सदस्यांनी आवाज उठवून डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी झाली होती.
....
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कमी पगार मिळत आहे. हेच मुख्य कारण तूर्तासतरी समोर आले आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात डॉक्टर तयार होत नाहीत.
(डॉ. मनीष रेंघे - जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे)