- धीरज परब
मीरारोड : भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क जवळील खाडी किनारी डॉल्फिन मासा आज बुधवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या तोंडाला जखम झाल्यामुळे रक्तस्त्रावहोत होता.
येथील खाडी किनारी कोळीवाडा असून त्यांच्या मासेमारी बोटी लागतात. सकाळी किनाऱ्यावर दोन बोटींच्या मध्ये डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला. रात्री एकच्या दरम्यान खाडीत जाळी टाकण्यासाठी जाणाऱ्या मच्छीमाराना कुठल्या तरी मोठ्या माश्याची चाहूल लागली होती. किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटीला आदळला व नंतर पुन्हा वेगाने खाडीत परतला होता असे स्थानिक डेनिस माल्या यांनी सांगितले.
सुमारे 7 फूट लांब असून तोंडाला जखम झाली आहे. तर शेपटी जवळ देखील जखमा आहेत. पहिल्यांदाच डॉल्फिन दिसून आल्याने लोकांनी मासा बघायला गर्दी केली होती. तर खाडीतील वाढते जल प्रदूषण, कचरा, प्लॅस्टिक आदी मुळे माश्यांच्या जिवावर बेतल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई आणि रायगड परिसरातील समुद्रकिनारी अनेक मोठमोठे मासे मृतावस्थेत सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.