- अनिकेत घमंडीडोंबिवली - येथील एमआयडीसी निवासी भागात नवीन काँक्रिट रस्ते बनविण्यात आले आहेत. काही ठराविक अंतरावर एमएमआरडीएच्या ठेकेदाराने काँक्रिट रस्त्याच्या खाली केबल्स, पाण्याच्या पाइपलाइन इत्यादी टाकण्यासाठी डक्ट ( पाईप ) याची सोय नियमानुसार केली होती. परंतु ते डक्ट (पाईप) आता खोदून शोधून मिळेनासे झाले असल्याची धक्कादायक बाब दक्ष रहिवासी राजू नलावडे यांनी उघडकीस आणली आहे.
काही दिवसापूर्वी मिलापनगर रस्ता क्रमांक तीन वर महावितरणची जमिनीखालील केबल नादुरुस्त झाल्याने 13 तास वीज पुरवठा बंद होता. नागरिकांना रात्रभर विजेविना राहावे लागले होते. दुसऱ्या दिवशी महावितरण कर्मचाऱ्यांनी काँक्रिट रस्त्याखालील केबल दोष शोधून काढला पण काँक्रिट रस्ता तोडून जॉइंट मारणे शक्य नसल्याने नवीन केबल टाकून ती रस्त्यापलीकडे ट्रान्सफॉर्मर कडे न्यायची होती. त्यासाठी नवीन काँक्रिट रस्त्याखाली टाकलेले डक्ट (पाईप) मधून सदर केबल न्यायची होती. यासाठी एमएमआरडीएचा ठेकेदार अभियंत्याला बोलावून त्या टाकलेल्या डक्टचा (पाईप) कुठे टाकला आहे याची जागा माहिती करून घेवून तेथे रस्त्याच्या कडेला खोदाई केली असता सदर डक्ट दिसून आला नाही. महावितरण कर्मचाऱ्यांनी अजून आजूबाजूला पण खोदाई केली तरीही तो टाकलेला डक्ट मिळाला नाही. महावितरणने वीज पुरवठा चालू करण्यासाठी नागरिकांचा आलेला दबाव पोटी शेवटी कंटाळून लांब वळसा घालून सदर केबल ट्रान्सफॉर्मर पर्यंत नेली. या कामासाठी महावितरणचे मनुष्यबळ श्रम आणि पैसा फुकट वाया गेला. असाच प्रश्न काही दिवसापूर्वी एका सोसायटीची पाण्याची पाइपलाइन नादुरुस्त झाल्याने निर्माण झाला होता. त्यांनाही बराच वळसा घेऊन पाइपलाइन टाकावी लागली होती. याबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत की हे डक्ट (पाईप) टाकताना रस्त्याच्या ठेकेदाराने काही खुणा मार्क या रस्त्यावर केल्या नव्हत्या का ? या डग बाबतीत नकाशा, नोंद इत्यादी माहिती रेकॉर्ड मध्ये ठेवली आहे का ? जर ठेकेदार पुढील काही दिवसातच आपले काम पूर्ण करून जाणार असल्याने पुढे याची जबाबदारी कोण घेणार आहे. केडीएमसी/एमआयडीसी यांना याबद्दल काहीच माहिती नसावी असे दिसत असल्याचे ते म्हणाले.
यापुढे असे प्रॉब्लेम झाल्यास काँक्रिट रस्त्याखालील डक्ट शोधण्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे की सरळ काँक्रिट रस्ता तोडून केबल किंवा पाण्याची पाइपलाइन टाकायची. आम्ही याबद्दल रस्त्यांच्या ठेकेदाराला विचारले असता त्यांनी काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला डक्टचा खुणा दाखविल्या पण त्या अस्पष्ट अशा होत्या. आणखी काही दिवसांनी त्या खुणा नाहीशा होतील. हे सर्व प्रॉब्लेम भविष्यात येणार असल्याने केडीएमसी/एमआयडीसी यांनी आताच रस्त्याच्या ठेकेदाराला पकडून त्याच्याकडून रस्त्यावरील डक्ट संदर्भात खुणा/मार्क करून घ्याव्यात तसेच सदर रस्त्यावरील टाकलेले डक्ट यांचा नकाशा घ्यावा, असे आम्ही सुचवीत आहोत. अर्थात हे आम्हालाच त्यांना सांगावे लागत आहे हेच आमचे दुर्दैव.- राजू नलावडे