डोंबिवली : डोंबिवली स्थानकातून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी जलद लोकल रात्रीच्या वेळी कल्याण येथील कारशेडनजीक फलाट क्रमांक-७ पुढील मोकळ्या जागेमध्ये थांबते. तेथूनच पहाटे ती लोकल सुटते. लोकल सुटण्याअगोदर कल्याणमधील असंख्य प्रवासी त्या लोकलमध्ये चढतात, त्यामुळे जेव्हा ती लोकल डोंबिवली स्थानकात फलाट क्र.-५ वर येते, त्यावेळी डोंबिवलीतील प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे ती केवळ नावाला डोंबिवली-सीएसएमटी जलद लोकल असून त्याचा डोंबिवलीकरांना काहीही फायदा नसल्याने ही लोकल डोंबिवली स्थानकातूनच सोडावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे.डोंबिवलीतील प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या केल्या आहेत. डोंबिवलीतील प्रवाशांचे म्हणणे असे की, लोकल रात्रीच्या वेळी ठाकुर्ली यार्डात आणावी. सकाळी तेथून ती सोडण्यात यावी, जेणेकरून डोंबिवलीकरांना त्यामध्ये बसण्यास जागा मिळेल. पण तसे न होता अनेकदा लोकल कल्याण येथूनच भरून येत असल्याने प्रवाशांचे नाहक वाद होतात. ठाकुर्ली, दिवा या स्थानकांमध्ये लोकल उभी केल्यास ती सकाळच्या वेळी डोंबिवलीतील जलद लोकलच्या फलाटावर आणण्यात अडथळे येत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.सकाळच्या वेळी एवढा वेळ प्रशासनाकडे नाही, त्यामुळे आदल्या दिवशी रात्री कल्याण येथे ही लोकल आल्यानंतर ती सायडिंगला उभी करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कल्याणमधून निघाली की, थेट डोंबिवलीला येते, परंतु त्या लोकलमध्ये आधीच प्रवासी बसून येत असल्याने डोंबिवलीकरांना त्या कथित डोंबिवली लोकलचा काहीच फायदा होत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.अनेकदा ही लोकल सकाळी वेळेवर येत नाही, त्यामुळे फलाट क्रमांक ५ वर गर्दी वाढत जाते. लोकल विलंबाने आल्याने अगोदर कल्याणहून खच्चून भरून आलेल्या लोकलमध्ये प्रवेश करताना डोंबिवलीतील प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे ही डोंबिवली जदल लोकल असून नसल्यासारखी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.तोपर्यंत समस्या कशी सुटणार?डोंबिवली रेल्वेस्थानकातून ही लोकल फलाट क्र.-२ वरून फलाट क्र.-५ वर येण्यात तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे फलाट क्र. ५/६ वा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर थेट डोंबिवली स्थानकातून लोकल सोडणे शक्य होईल का, असा प्रवाशांचा सवाल आहे. तोपर्यंत जलद लोकलच्या फेºया वाढणार नसल्याने समस्या सुटणार कशी, असा डोंबिवलीकर प्रवाशांपुढील पेच आहे.
जलद डोंबिवली लोकल कल्याणलाच फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:23 AM