डोंबिवली : रेल्वेस्थानकातील पूर्व-पश्चिमेला जोडणाºया ठाकुर्ली आणि कोपर दिशेकडील फेरीवाल्यांचा मुक्काम अजूनही कायम आहे. स्कायवॉकवर सायंकाळच्या वेळेत भरणाºया बाजारामुळे घरी परतणाºया चाकरमान्यांनी चांगलीच कोंडी होत आहे. त्यातून वाट काढताना अनेकदा चेंगराचेंगरी आणि धक्का लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटना आणि मनसेने फेरीवाला हटाव, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतरही केडीएमसी प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील फेरीवाल्यांवर कारवाई केलेली नाही. दुसरीकडे मनसेने २ आॅक्टोबरला गांधीजंयतीला या पुलावरील फेरीवाल्यांना गुलाब फूल देत केलेल्या गांधीगिरीनंतरही येथील फेरीवाले हटलेले नाहीत.डोंबिवलीत रेल्वेस्थानक परिसरातील अरुंद रस्ते आणि त्यातच तेथे ठाण मांडणाºया फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने दोन मोठे स्कायवॉक बांधले. मात्र, सध्याच्या वाढत्या प्रवाशांच्या गर्दीपुढे हे स्कायवॉक अरुंद ठरत आहेत. त्यात तेथे सायंकाळी फेरीवाले आपले बस्तान मांडतात. महापालिकेने अलिकडेच छत टाकल्याने फेरीवाल्यांचे चांगलेच फावत आहेत. स्कायवॉकवर दोन्ही बाजूला बसणाºया फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना त्यातून वाट काढणे अवघड बनले आहेत. अनेकदा धक्काबुक्कीमुळे होणारे वाद, मारहाणीचे प्रकार तसेच चेंगराचेंगरीमुळे प्रवासी त्रस्त आहेत.एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ आॅक्टोबरला चर्चगेट स्थानकात संताप मोर्चा काढला होता. त्यावेळी ठाकरे यांनी रेल्वे स्थानकांसह परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्तांना १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यावेळी पोलिसांनी तोंडदेखली कारवाई केली होती.मात्र, या आंदोलनानंतर डोंबिवलीतील स्कायवॉक मोकळा झाल्याचे फोटो मनसे कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर टाकून आनंद व्यक्त केला होता. पण अवघ्या ४८ तासांत फेरीवाल्यांनी पुन्हा स्कायवॉकवर ठाण मांडल्याने ठाकरे यांच्या आदेशाला बगल दिल्याची चर्चा झाली.डोंबिवलीत रविवारी रात्री स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्यांचे छायाचित्रे नागरिकांनी सोशल मीडियावर टाकत नाराजी व्यक्त केली. मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील व प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सोशल मीडियावरील पोस्टची गंभीर दखल घेतली. या बाबत केडीएमसीचे संबंधित प्रभाग अधिकारी, महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सोमवारीही बाजार -डोंबिवली स्थानकातील स्कायवॉकवर नेहमीप्रमाणे सोमवारीही बाजार भरला होता. दिवाळी तोंडावर आल्याने त्यात आणखी काही फेरीवाल्यांची भर पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आधी शिवसेना आणि नंतर मनसेने केलेल्या आंदोलनाचा फुसका बार होता का?, अशी चर्चा डोंबिवलीकरांमध्ये रंगली होती.
डोंबिवलीत फेरीवाल्यांचा मुक्काम :स्कायवॉकवर होतेय कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:09 AM