- मुरलीधर भवार
डोंबिवली - महिन्याभरापूर्वी एक विवाहित महिलेचा घराच्या गॅलरीतून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात तिच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र तिच्या मृत्यूचे खरे कारण आत्ता समोर आले आहे. तिचा अपघाती मृत्यू नसून तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिच्या कुटुंबियांना हरीयाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. हा गुन्हा हरियाणाहून मानपाडा पोलिस ठाण्याकडे वर्ग झाल्याने मानपाडा पोलिसांनी तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अजय ऋषिपाल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
तिच्या अपघाती मृत्यूविषयी तिच्या घरच्या मंडळींना संशय होता. तिचा मृत्यू अपघाती नसून अन्य काही कारणामुळे तिने घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली असावी. मृत महिला ही मूळची हरियाणातील असल्याने तिच्या हरियाणा येथील कुटुंबियांनी हरियाणी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तिच्या कुटुंबियानी दिलेल्या तक्रारीनुसार मृत महिलेचा प्रियकर अजय ऋषिपाल हा तिला तिच्या लग्ना आधीचे फोटो व्हाटसअपवर व्हायरल करण्याची धमकी देत होता. तो तिच्याकडे फोटो व्हायरल न करण्याच्या बदल्यात पैशाची मागणी करीत होता. तिला वारंवार ब्ल’कमेल करीत होता. या मानसिक तणावतून महिलेने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. महिलेचा मृत्यू डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाला असल्याने हरीयाणा पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा तपासाकरीता मानपाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. मानपाडा पोलिसांनी महिलेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अजय ऋषिपाल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी सर्जेराव पाटील करीत आहेत. आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.