- अनिकेत घमंडीडोंबिवली - गणेशोत्सव सुरु होण्यापुर्वी कोकणच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील एक मार्गिका खड्डेमुक्त करुन देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. त्याचदृष्टीने डोंबिवलीतील कोकणवासीयांच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणत मुंबई-गोवा महामार्गाचे वास्तव स्पष्ट करण्यासाठी रविवारी डोंबिवली जिमखाना येथील सभागृहात सकाळी १० ते १ वाजेपर्यंत चर्चासत्राच्या माध्यमातून चव्हाण संवाद साधणार आहेत.
गेल्या काही काळापासून या रस्त्यांच्या कामाच्या पहाणीसाठी त्यांचे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील दौरेही सुरू आहेत. या रखडलेल्या महामार्गावरुन मनसेच्या युवा कार्यकर्ते पदयात्रा करत आहेत. ही आंदोलने होत असताना मंत्री चव्हाण यांनी त्यांचे मूळचे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात मुळ गाव असलेल्या ठाणे, डोंबिवलीकर चाकरमान्यांना साद घालण्यासाठी चर्चासत्र घेतले आहे. राजकीय आंदोलनांना संयमपणे चर्चासत्रातून उत्तर देण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा चव्हाण समर्थकांनी केला. सरकार हा मार्ग पुर्ण करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, डोंबिवलीकर कोकणस्थांना वेगवेगळ्या चित्रफिती, नवे लक्ष्य, कामे पुर्ण करण्यासाठी केली जाणारी आखणी, त्यामध्ये येणारे अडथळे अशी माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था या चर्चासत्रांच्या माध्यमातून होत असल्याचे सांगण्यात आले.