डोंबिवली : पूर्वेतील केळकर रोडच्या निम्म्या भागाच्या काँक्रिटीकरणाचे काम बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाले. या कामामुळे केळकर रोडवरील रिक्षा स्टॅण्ड पाटकर रोडवर स्थलांतरित केला होता. मात्र, त्याचा फटका केडीएमटीला बसू नये, यासाठी रिक्षा स्टॅण्ड केळकर रोडवरच कायम ठेवण्यात आला. परिणामी पश्चिमेकडून येणाºया चारचाकी, दुचाकी व अवजड वाहनांना साधारणपणे महिनभर केळकर रोडवर प्रवेशबंदी असणार आहे. या वाहनांना टंडन आणि शिवमंदिर रोडमार्गे चार रस्त्याने एमआयडीसी अथवा मानपाडा रस्त्याकडे जाता येईल.केळकर रोडच्या कामामुळे रिक्षा स्टॅण्ड बुधवारी प्रायोगिक तत्वावर पाटकर रोडवर हलवण्यात आला. पण त्याचा फटका केडीएमटीच्या लोढा, व मानपाडा मार्गावर जाणाºया बसना बसला. त्यामुळे बुधवारी रात्री नागरिकांनी प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला मंचकडे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वाहतूक शाखेच्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीला आरटीओ, ट्रॅफिक, नगरसेवक, केडीएमसीचे अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, रिक्षा युनियनचे पदाधिकारी, आॅटोवाला मंचचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या वेळी झालेल्या निर्णयानुसार स्वामी विवेकानंद रोडवरून शिवमंदिर रोडवर जाणारी वाहतूक एक दिशा केली जाईल. चिपळूणकर रोडवरून फक्त रिक्षाच केळकर रोडवर स्टॅण्डकडे जातील. अन्य कोणत्याही वाहनांना या मार्गाने जाता येणार नाही.पश्चिमेकडे जाणाºया वाहनांना चिपळूणकरमार्गे टंडन रोडहून उड्डाणपुलावरून जाता येईल. तर पश्चिमेहून येणारी वाहने थेट टंडन रोड, शिवमंदिर रोडमार्गे एमआयडीसी, मानपाडा रोड, दत्त मंदिर चौक येथे जातील. केडीएमटीच्या बस टंडन रोडमार्गे केळकर रोड, स्वामी विवेकानंद रोडमार्गे डॉ. राथ रोड येथे जातील. तेथून त्या मानपाडा, लोढा, नांदिवली, नवनीतनगर, गोग्रासवाडी आदी भागात धावतील, असेही ठरवण्यात आले. या बदलांबाबत जागृतीसाठी स्थानिक नगरसेवक मंदार हळबे काही ठिकाणी बॅनर लावणार आहेत. मंदार हळबे, रिक्षा युनियनचे काळू कोमास्कर, संजय मांजरेकर यांनी समन्वय साधत या उपाययोजना करण्याचे आवाहन वाहतूक व आरटीओ अधिकाºयांना केले. त्याला सहायक पोलीस आयुक्त बाबासाहेब आव्हाड, आरटीओ अधिकारी सूर्यकांत गंभीर, पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे सकारात्मक प्रतिसाद दिला.
डोंबिवली : केळकर रोडवर केवळ रिक्षांना मुभा : पश्चिमेतील वाहनांना महिनाभर प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:42 AM