- अनिकेत घमंडी
डोंबिवली - अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सलग दुसऱ्या वर्षी विनामूल्य लेझिम कार्यशाळेचे आयोजन ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत केले होते. यावर्षीही डोंबिवलीतील पारंपरिक नृत्य निपूण विवेक ताम्हणकर यांनी मंडळाच्या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. साधारणपणे सर्व वयोगटातील १२५ महिला, युवती, मुली, मुलांचा उदंड प्रतिसाद या शिबिराला मिळाला.
पारंपारिक पध्दतीने निघणाऱ्या टिळकनगर गणेशोत्सवाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत, लेझिम खेळायला तरुणाईला सामिल होता यावे म्हणून ढोल आणि हलगीच्या तालावर लेझिमच्या वेगवेगळ्या ठेक्यांवर विविध लेझीम प्रकार खेळण्याचा कसून सराव ताम्हणकर करुन घेतला. सर्वांनी या कार्यशाळेचा मनमूराद आनंद लुटला. रविवारी रात्री शेवटच्या दिवशी मंडळातर्फे सर्व शिबिरार्थींचे आणि ताम्हणकरांचे आभार मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी मानले, कार्यवाह बल्लाळ केतकर यांनी भेटवस्तू देऊन सन्मान केला. मंडळातर्फे सोनाली गुजराथी, चैत्राली भावे आणि सिध्दी वैद्य यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.