डोंबिवलीत आयरे गावात वर्क आॅर्डर नसताना शौचालयाच्या दुरुस्तीचे काम?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 05:41 PM2018-02-17T17:41:56+5:302018-02-17T17:45:25+5:30
आयरे गावातील सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. पण त्या कामासाठी महापालिकेची कोणतीही वर्क आॅर्डर नसताना सर्रास काम सुरु करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी केला आहे.
डोंबिवली - आयरे गावातील सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. पण त्या कामासाठी महापालिकेची कोणतीही वर्क आॅर्डर नसताना सर्रास काम सुरु करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी केला आहे. शौचालयांची स्थिती आधीच गंभीर असताना त्यात वर्क आॅर्डर नसताना काम सुरु करणे हे आणखी धोक्याचे आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच उघड्यावर शौचास जावे लागत आहे. एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हागणदारी मुक्त भारत करण्यासाठी कंबर कसत असून डोंबिवलीत सुरु असलेला हा प्रकार निंदनीय आहे.
त्यासंदर्भात आक्षेप घेत पाटील यांनी महापालिका आयुक्त पी.वेलरासू यांना पत्र लिहिले असून त्या कामासंदर्भात चौकशी व्हावी आणि आरोपात तथ्य आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. शौचालय दुरुस्तीसाठी महापालिकेच्या अधिका-यांनी त्या शौचालयाची पाहणी केली आहे का? त्यासाठी योग्य तो अहवाल बनवला आहे का? महापालिका ठेकेदार सांगेल त्या प्रमाणे देयक अदा करणार आहे का? यासंदर्भात माहिती मिळणे आवश्यक आहे असे सवाल त्यांनी पत्रात नमूद केले आहेत. जर असा अहवाल(प्राकलन) तयार केले असेल तर त्याची माहिती देण्यात यावी असेही ते म्हणाले. या शौचालयांची दुरावस्था २०१६ पासून होती, अनेक ठिकाणी दरवाजे तुटलेले, भांडी तुटलेली, गळकी नळ अशांमुळे नागरिकांचे हाल होत होते.
त्यातच आता या शौचालयाची दुरुस्ती करताना एकदम सगळी कामे काढण्यात आली आहेत. त्यात पूर्ण ड्रेनेज लाईन तोडण्यात आल्याने व शौचालायचा मार्गात अडथळे आल्याने नागरिकांना शौचालयाचा वापर करतांना अडचणी येत आहेत. त्यामुळे हे काम कधी, कसे कोणाला व किती कालावधीसाठी देण्यात आले, त्यासाठीचा निधी आदी बाबींची चौकशी करावी, नागरिकांची गैरसोय टाळावी अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.