लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवार, रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयाविरोधात शनिवारी सकाळपासून डोंबिवलीतील सुमारे ५०० व्यापारी, दुकानदार आणि ज्वेलर्स असोसिएशनने नाराजी व्यक्त करत ‘पालिका आयुक्त हटाव, दुकाने बचाव,’ अशी जोरदार घोषणाबाजी करत मनपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाबाहेर रस्त्यावर ठिय्या दिला. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.
मनपाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, घाऊक बाजारपेठा शनिवारी सकाळपासून बंद ठेवल्या होत्या. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्यांनी मनपाच्या विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली. एकीकडे लोकल, बसमध्ये गर्दी वाढत असून त्यावर सरकार कोणतेही निर्बंध लागू करत नाही. मात्र, केवळ व्यापाऱ्यांना वेठीस धरून त्यांना दर शनिवारी आणि रविवारी सक्तीने दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातही दारू विकण्यास परवानगी दिल्याने सरकार आणि मनपा आयुक्त दुजाभाव करत असल्याचा आक्षेप व्यापाऱ्यांनी घेतला. मात्र, या निर्णयामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ येईल, त्यामुळे हा आदेश मनपा आयुक्तांनी मागे घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.
‘जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करू’, असे व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष दिनेश गोर आणि डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे सेक्रेटरी दिलीप कोठारी यांनी सांगितले. वर्षभरापासून दुकानदारांवर अन्याय होत आहे. त्याकडे कोणीही नीट लक्ष देत नाहीत. मात्र, ऊठसूट दुकाने बंद केली जात आहेत, हा काय प्रकार आहे, असा सवाल गौर यांनी केला. पूर्वेला दर सोमवारी, तर पश्चिमेला बुधवारी दुकाने बंद ठेवायला आम्ही तयार आहोत, पण सरसकट शनिवार, रविवार बंदी हे योग्य नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये म्हणून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. ठिय्या आंदोलन करू नका, असे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केले. या आंदोलनाप्रकरणी सायंकाळपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘ रविवारी व्यवसायाला मुभा द्या’
- आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मनपा आयुक्त अथवा उपायुक्त न आल्याने आमदार चव्हाण यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे आणि भारत पाटील यांची भेट घेतली.
- होळीसाठी व्यापाऱ्यांनी गुंतवणूक करून माल आणला आहे, त्यासाठी त्यांना रविवारी व्यवसायाची मुभा द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली.
- मात्र, त्यानंतर तेथूनच चव्हाण यांनी फोनद्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. या प्रश्नावर त्यांच्याशी भेटून चर्चेअंती तोडगा काढू या, कायदा सुव्यवस्था व्यापाऱ्यांनी हातात घेऊ नये, असेही आवाहन चव्हाण यांनी केले.
--------------