डोंबिवली : आधीच आठवड्यातून तीन दिवस पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांना आता ‘घरपोच’ सांडपाणी पुरवण्याची ‘कृपा’ पालिकेने केली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या भीषण प्रश्न उभा ठाकला आहे. काही भागांत अपुऱ्या पाणीपुरवठ्यातून मागवलेल्या टँकरच्या पाण्यामुळे, सोसायट्यांच्या टाक्या वेळेत साफ न केल्याने कावीळ, अतिसाराची साथ पसरलेली असतानाच सांडपाणीमिश्रित पाण्यामुळे रहिवासी धास्तावले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील घान:श्याम गुप्ते क्रॉस रोडवरील अनेक निवासी संकुलांना असा पाणीपुरवठा होत असल्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी केडीएमसीकडे तक्रारही केली आहे. मात्र पालिकेने कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. गुप्ते क्रॉस पथावरील एलोरा सोसायटी परिसरातील निवासी संकुलात १० ते १२ दिवसांपासून सांडपाणीमिश्रित येत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना पाणी असूनही सध्या पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत, केडीएमसीचे ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांना रहिवाशांनी निवेदनही दिले. लोकप्रतिनिधींकडेही याप्रकरणी तक्रार करण्यात आली. परंतु, कार्यवाही झालेली नसल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याची समस्या ‘जैसे थे’च आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकारी कुमावत यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
डोंबिवलीत पश्चिमेत घरपोच सांडपाणी!
By admin | Published: April 21, 2016 2:27 AM