डोंबिवली : महागाईने ग्रासलेल्या कामगार वर्गाला पुरेशा जेवणा व्यतिरिक्त वडा-पाववर स्वतःची गुजराण करावी लागत आहे. अशा कामगारांना किमान पोटभर जेवण कमी पैशात मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लालबावटा रिक्षा युनियन, डोंबिवली आणि प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांसाठी फक्त 20/- रुपयात ‘आपलं जेवण’ उपक्रम सुरु करण्यात आला. त्या ‘आपलं जेवण’ उपक्रमाचे महापौर विनिता राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कामगार वर्गाला महपौरांच्या हस्ते पहिली जेवणाची थाळी देण्यात आली.
कॉम्रेड शहीद भगतसिंग जयंतीचे औचित्य साधून पूर्वेकडील डॉ. राथ रोड येथे ‘आपलं जेवण’ उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात महापौर विनिता राणे, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, कॉम्रेड नेते प्रकाश रेड्डी, कॉम्रेड काळू कोमास्कर, बहुजन समाज पार्टी प्रदेश सचिव दयानंद किरतकर, रिक्षा युनियन नेते संजय मांजरेकर, दत्ता माळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर विनिता राणे म्हणाल्या, आपलं जेवण हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यात आला आहे. जेवणात कोणताच पक्ष नसतो. पोटापाण्यासाठी जेवणाची पर्वा न करता येथील कामगार वडा-पाव खात होते. पण आता त्यांना या उपक्रमामुळे कमी पैशात पूर्ण जेवण मिळणार आहे ही मोठी गोष्ट आहे. तर बसपाचे दयानंद किरतकर म्हणाले, अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. डोंबिवलीत खेडेगावातून पोट भरण्यासाठी कामाला येणाऱ्या नाका, रिक्षा कामगारांची संख्या मोठी आहे. या उपक्रमातील आपलं जेवण हे फक्त वीस रुपयात देतांना आयोजकांची दमछाक होणार आहे. या उपक्रमासाठी जो काही तुटवडा पडेल त्याच्या महिनाभरचा भार आम्ही नक्कीच पेलू असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी कॉम्रेड नेते प्रकाश रेड्डी म्हणाले, कष्टकरी कामगारांना कमी पैशात जेवण मिळणार आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. युनियन म्हटली कि फक्त पगारवाढ हा विषय घेऊन काम केले जाते. पण या लालबावटा रिक्षा युनियनचे पदाधिकारी कामगारांना कमी पैशात जेवण मिळावे यासाठी झगडत आहेत ही मोठी बाब आहे. पूर्वी गिरणी कामगारांना कमी पैशात जेवण देण्याचे काम क्रांती जगताप यांच्या सहकार्याने महिलांनी अन्नपूर्णा नावाच्या संस्थेमार्फत सुरु केले होते त्याची आठवण आज येत आहे.
किमान 200 कामगारांना मिळणार जेवण
या उपक्रमातून प्रतिदिन दुपारी 12 ते 2 या वेळेत किमान 200 कामगारांना फक्त 20 रुपयात ‘आपलं जेवण’ मिळणार आहे. शहरात या उपक्रमाच फायदा रिक्षाचालक, फेरीवाले, नाका कामगार, श्रमिक, कष्टकरी आणि बेरोजगार यांना मिळणार असून या उपक्रमाला अनेकांची मदत मिळत असल्याचे उपक्रम प्रमुख कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी सांगितले.