डोंबिवली : केडीएमसी परिक्षेत्रात सुरू असलेल्या शून्य कचरा मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महापालिका करत असली तरी नागरिकांची कचरा रस्त्यावरच टाकण्याची प्रवृत्ती थांबलेली नाही. त्यात कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आता पावसाळाही सुरू झाल्याने साथीचे आजार उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेकडून नागरिकांना स्वच्छतेचे धडे दिले जात असले तरी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयालगतच्या रस्त्यावरच कचरा पडल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे सुरू केलेल्या मोहिमेत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. हा कचरा संकलन करण्यासाठी काही ठराविक दिवसांचे वारही ठरवले गेले आहेत. या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, आजही नागरिक कचरा रस्त्यावर टाकत आहेत. केडीएमसीच्या डोंबिवली पूर्वेतील विभागीय कार्यालयालगत असलेल्या शहीद भगतसिंग रोडवर हे चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एक रुग्णालय असून त्याच्यासमोरच हा कचरा पडलेला असतो. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने कचऱ्यातून दुर्गंधी पसरत आहे. एकीकडे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. डोंबिवली पूर्वेत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात आता पावसाला सुरुवात झाल्याने कचरा कुजून साथीचे आजारही बळावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.डेब्रिजचेही ‘तीनतेरा’ :आजघडीला कचरा नियमितपणे उचलला जात नसताना आता कचºयाबरोबर डेब्रिजचे ढिगारेही शहरात दिसू लागले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील सावित्रीबाई फुले कलामंदिर परिसरातील रस्त्याच्या बाजूला डेब्रिज टाकण्याचे हक्काचे ठिकाण बनले असताना डोंबिवली पश्चिमेतील बावनचाळीच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जात आहे. याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याने डेब्रिजचा पसारा वाढत चालल्याचे दिसत आहे.