डोंबिवली : शहरातील विविध बँक ग्राहकांच्या खात्यांमधून पैसे अचानक काढण्यात आल्याची घटना डोंबिवलीत शनिवारी उघडकीस आली. कॉनरा बँकेतील सात ग्राहकांच्या खात्यांमधून सव्वादोन लाख रुपये दोन दिवसांत दिल्लीतून वळते झाले आहेत. तर एका महिलेच्या युनियन बँकेच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. याप्रकरणी खातेदारांनी अनुक्रमे रामनगर आणि टिळकनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकारामुळे बँकेत ठेवलेली आयुष्यभराची पुंजीही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.प्राथमिक माहितीनुसार, खातेदारांच्या खात्यातून गुरुवारी रात्रीपासून पैसे काढल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत खातेदारांनी तक्रार अर्ज दिल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी दिली. यासंदर्भात बँक व्यवस्थापनांशी चर्चा सुरू आहे. बँकेने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पूर्वेला पाटकर रोडवर कॅनेरा बँकेची शाखा आहे. त्यातील सात खातेदारांना या प्रकाराचा फटका बसला आहे. त्यात दोन महिला आहेत. त्यांच्या खात्यातून ६० हजार, १५ हजार, ७० हजार, २ हजार अशा विविध रक्कमा दिल्लीतून आपोआप वळत्या झाल्या आहेत. तर युनियन बँकेच्या महिला खातेदाराच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. या प्रकारामुळे बँके व्यवस्थापन तणावाखाली आहे. गुन्हे विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांनी बँकेशी संपर्क साधून तपास सुरू केल्याचे पवार म्हणाले. परेश भोंडीवले (रा. रामनगर) हे शुक्रवारी कुटुंबासह बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांनी वाहनात पेट्रोल भरल्यानंतर कार्डद्वारे बिल भरले. मात्र, मोबाइलवर आलेल्या मेसेजमध्ये कॅनेरा बँकेच्या खात्यातून हजार-बाराशेएवेजी १० हजार रुपये वळते झाले. त्यामुळे गोंधळलेल्या भोंडीवले यांनी शनिवारी सकाळी बँक गाठली. तेथे चौकशीदरम्यान अन्य खातेदरांच्या खात्यातूनही पैसे वळते झाल्याचे बँक व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान त्यांनी पोलिसात तक्रार दिली.नेमका प्रकार कशामुळे?खातेदारांच्या खात्यातून पैसे नेमके कसे वळते झाले, याची चाचपणी सुरू आहे. एटीएम किंवा नेटबँकिंगमुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या परिसरातील एटीएमचीही पाहणी करण्यात आली, त्यात कुठेही चिप लावली आहे का? त्यामुळे काही गडबड झाली का?, या सगळ््याची चाचपणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोंबिवलीत बँक ग्राहकांना गंडा! कॅनेरा, युनियन बँकेचे आठ खातेदार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 2:52 AM