डोंबिवली : एकीकडे कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग बंद करून तेथे फळाफुलांची बाग फुलवण्याचा उपक्रम राबविण्याचा मानस केडीएमसी प्रशासनाचा असताना, दुसरीकडे डोंबिवली शहरातील रस्त्यालगत टाकल्या जाणाऱ्या आणि अनेक दिवस साचून राहणाºया कचºयाकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. येथील एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या बाजूला सर्रास डेब्रिजचा कचरा टाकला जात आहे. सूचनाफलक लावूनही साचत असलेले डेब्रिजचे ढिगारे पाहता लावलेले फलक एकप्रकारे शोभेचे बाहुले ठरले आहेत.
जून २०१७ मध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केडीएमसीच्या वतीने डेब्रिजमुक्त रस्ते व पदपथ अभियान सुरू करण्यात आले होते. पण, कालांतराने या अभियानाचा बोºया वाजल्याने ते बंद पडले. घनकचरा व्यवस्थापन विभागाने डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा ही योजना सुरू केली. यासाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर केला आहे. पण, आताही तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. शहरातील नागरिक व विकासकांमार्फत करण्यात येणाºया बांधकाम व दुरुस्तीच्या कामांमधून मोठ्या प्रमाणात डेब्रिज निर्माण होते. त्याची कॉल आॅन डेब्रिजच्या माध्यमातून विल्हेवाट न लावता ते सर्रास रस्त्याच्या बाजूला टाकले जात आहे. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील पेंढरकर महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रस्त्यासह अन्य ठिकाणी हे चित्र कायम पाहायला मिळत आहे. ते उचलले जात नसल्याने डेब्रिजचे ढिगारे जमा झाले आहेत.स्वच्छता मार्शलचा विसर‘येथे कचरा टाकू नये. टाकल्यास दंडात्मक कारवाई/फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल’ अशा सूचनांचे फलक पेंढरकर महाविद्यालयाच्या मागील रस्त्याच्या ठिकाणी लावले आहेत. यानंतरही डेब्रिजचा कचरा टाकणे सुरूच आहे. या परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी स्वच्छता मार्शल नेमण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले होते; पण त्या नेमणुकीलाही मुहूर्त मिळाला नसल्याचे तिथल्या परिस्थितीवरून दिसत आहे.