डोंबिवली : तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने घंटागाडी, आरसी वाहन कर्मचाºयांनी डोंबिवलीत आंदोलन करून कचरा न उचलण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पहिल्या सत्रात शहरात जागोजागी कचºयाचे ढीग झाले होते. त्याची गंभीर दखल घेत आयुक्त गोविंद बोडके यांनी खंबाळपाडा येथे आंदोलनकर्त्या कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांना खडेबोल सुनावले. कामगारांचे थकलेले वेतन संध्याकाळपर्यंत न दिल्यास कायद्याचा बडगा उगारावा लागेल, अशी तंबी त्यांनी विशाल एक्स्पर्ट सर्व्हिस या ठेकेदार कंपनीला दिली. आयुक्तांच्या आश्वासनानंतर कर्मचाºयांनी आंदोलन स्थगित केले. पगार न झाल्यास पुन्हा कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ऐन उत्सवाच्या काळात जनतेला वेठीस धरणे उचित नाही. कर्मचाºयांचे पगार महापालिकेने अडवले नसून ती ठेकेदाराची जबाबदारी आहे. त्यामुळे तातडीने कामावर हजर व्हा. अन्यथा, कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशी समज पालिका आयुक्तांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. ठेकेदार कंपनीने येथील ४०० कर्मचाºयांचे तीन महिन्यांचे पगार थकवल्याची माहिती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश उज्जेनकर यांनी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते मंदार हळबे, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य ओम लोके आदींसह अन्य पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात डोंबिवली आणि नंतर कल्याणात कुठेही कचरा न उचलण्याचा पवित्रा घेत आंदोलक कर्मचाºयांनी खंबाळपाडा येथे ठिय्या आंदोलन केले. कचरावाहक वाहनांच्या टायरची हवा कर्मचाºयांनी काढली. आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.