डोंबिवली : शहरातील पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मेपासून वाहतुकीसाठी बंद करावा, असे पत्र मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला पाठवले आहे. त्यामुळे महापालिकेची पंचाईत झाली आहे. हा पूल वाहतुकीलाठी बंद केल्यास शहरात उद्भवणाऱ्या वाहतूककोंडीला कसे सामोरे जायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही पूल बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यास त्याच्या डागडुजीसाठी साधारणपणे आठ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढा मोठा काळ वाहतूकबदलांसह सर्वच नियोजन काटेकोरपणे करावे लागणार आहे. परिणामी, वाहतूक नियंत्रण विभागासमोरही पेच आहे.मध्य रेल्वेच्या अभियंता विभागातील सहायक अभियंता आर.एन. मैत्री, विभागीय अभियंता दीपक पाटील आदींसमवेत महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकारी सपना कोळी, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांच्यामध्ये गुरुवारी बैठक झाली. त्यात या पुलाच्या डागडुजीचा खर्च कोणी उचलावा तसेच त्याचा अंदाजे खर्च किती असेल, यासंदर्भात चर्चा झाली. डागडुजी रेल्वे प्रशासन करणार असून निधीची तयारी महापालिकेने करावी, असेही सुचवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत रेल्वेच्या हद्दीतील पुलांची डागडुजी रेल्वेने केली आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी यावेळी रेल्वेला सांगितले. पण, तसे या पुलासंदर्भात करता येणार नाही, असे स्पष्टीकरण रेल्वेने दिले.हा पूल १९७८ मध्ये बांधण्यात आला आहे. तेव्हा महापालिका अस्तित्वात नव्हती. त्यामुळे नेमका करार काय झाला होता, त्याची प्रत महापालिकेला मिळावी, अशी मागणी कोळी यांनी केली आहे. साधारणपणे रेल्वे उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील काम रेल्वे प्रशासन करते. त्यास लागणारे जोडरस्ते आणि वरील रस्त्याचा भाग याची देखभाल, डागडुजी ही स्थानिक स्वराज्य संस्था करते, असा निकष असल्याने नेमका खर्च कोणी करायचा, हे करारपत्र बघून त्यानंतरच स्पष्ट केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, वाहतूक नियोजन करण्यासंदर्भात ठाणे येथील वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त अमित काळे यांना आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिट अहवालासह मध्य रेल्वेचे पत्र पाठवण्यात येणार आहे, असे महापालिकेतील सूत्रांनी यावेळी सांगितले.अनेक प्रश्न अनुत्तरीतच : मुळात उड्डाणपुलाच्या डागडुजीच्या कामाचा खर्च कोणी करायचा, हेच अद्याप ठरलेले नाही. त्यात जबाबदारी जरी निश्चित झाली, तरी त्या कामाचे टेंडर कधी निघणार? त्याला लागणारा अवधी आणि तोंडावर आलेला पावसाळा त्यात काम केले जाणार का? हे प्रश्न अनुत्तरीतच आहे.तसेच रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता डी.डी. लोलगे यांनी महापालिकेला पत्र दिले असून ते रजेवर असल्याने बैठकीला अनुपस्थित होते, असे सांगण्यात आले. त्यामुळे गुरुवारी झालेल्या दोन्ही यंत्रणांच्या बैठकीमधून विशेष काही निष्पन्न झाले नसल्याचे चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.
डोंबिवलीतील उड्डाणपुलाच्या डागडुजीसाठी लागणार आठ महिने?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:13 AM