डोंबिवली : डोंबिवलीतील रासायनिक जलप्रदूषणाचा प्रश्न गाजत असतानाच पावसाळी वातावरणाचा फायदा घेत मोठया प्रमाणात धूर सोडण्यात आल्याने सोमवारी रात्री डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरला. त्याबाबत तक्रार करण्यासाठी वारंवार संपर्क करूनही प्रदूषण मंडळाचे अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिकांनी स्वत: शोध घेत धूर सोडणाऱ्या कंपनीचा शोध घेतला. त्याबाबतची पोलिसांना तक्रार नोंदवून घ्यायला लावली. रात्रभर नागरिकांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने अखेर सकाळी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास धुराचा त्रास जाणवू लागल्याने जागरुक नागरिक राजू नलावडे वेगवेगळ््या भागात फोन करून सर्वत्र धूर पसरल्याची खात्री कारून घेतली. तो फेज टू मधील ओयासिस कंपनीतून येत असल्याचे त्यांना आणि त्यांचे सहकारी अनिरूद्ध महाडिक यांच्या लक्षात आले. त्यांनी शिवसेना कार्यकर्ता संदीप नाईक यांना सोबत घेत परिसराची पाहणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण त्यांनी फोन उचलला नाही. कंपनीत जबाबदार व्यक्ती नसल्याने नागरिकांनी मध्यरात्री मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. हे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे असल्याचे सांगत पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली. नागरिकांनी आग्रह धरूनही तक्रार दाखल होत नसल्याने शेवटी वरिष्ठ अधिकारी तेथे आले आणि त्यांनी नागरिकांची तक्रार दाखल करुन घेतली. तक्रार दाखल झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. ओयासिस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे मंडळाचे कल्याण कार्यालयातील प्रादेशिक उप अधिकारी अमर दुर्गले यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यानी पर्यावरण आणि उद्योगमंत्र्यांकडे तक्रार केली असून बैठक बोलावण्याची मागणी केली.
डोंबिवली गुदमरली
By admin | Published: October 05, 2016 2:44 AM