डोंबिवली : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात सोमवारी दुपारी फेरीवाल्यांमध्ये जुंपली असतानाच रात्रीही राडेबाजीचा प्रयोग पाहावयास मिळाला. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. दरम्यान, राडेबाजी करणाऱ्या फेरीवाल्यांशी आमचा काहीही संबंध नाही, असे सांगत येथील कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता युनियनने कानांवर हात ठेवले आहेत.केडीएमसी ठोस कारवाई करत नसल्याने डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. त्यातच जागेवरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारीच्या घटना सर्रास घडत आहेत. याच कारणावरून सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास येथील इंदिरा चौकात फेरीवाल्यांमध्ये जुंपल्याचे पाहावयास मिळाले. या हाणामारीत पुरुषांसह एक महिलाही होती. या घटनेला काही तास उलटत नाही, तोच रात्री पुन्हा या राडेबाज फेरीवाल्यांमध्ये पुन्हा हाणामारी झाली. या प्रकारामुळे केडीएमसी प्रशासन आणि पोलिसांचा या फेरीवाल्यांना धाक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.सोमवारी घडलेल्या या राडेबाजीनंतर मंगळवारी मात्र दिवसभर संबंधित फेरीवाले गायब झाले होते. तसेच जेथे त्यांनी बिनदिक्कतपणे व्यवसाय थाटले होते, तेथेही त्यांचे अतिक्रमण आढळले नाही. सोमवारच्या या हाणामारीच्या प्रकारानंतरही फेरीवाल्यांविरोधातील ठोस कारवाई केडीएमसीकडून दिसून आली नाही. दरम्यान, राडेबाजीच्या प्रकरणात फेरीवाल्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.एकीकडे फेरीवाल्यांच्या मुजोरीला युनियनचा पाठिंबा लाभत असताना राडेबाज फेरीवाल्यांचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असा दावा कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी केला. अशा राडेबाज फेरीवाल्यांमुळे अन्य फेरीवाले बदनाम होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
डोंबिवलीत फेरीवाल्यांचे धूमशान, रात्री पुन्हा हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:27 AM