डोंबिवली: घरांच्या व्यवहारांसंदर्भात आॅनलाइन नोंदणीचे सर्व्हर वीस दिवसांपासून कूर्मगतीने सुरु असल्याने शेकडो ग्राहक हैराण झाले आहेत. दिवसातून अनेक वेळा सर्व्हर बंद पडते, सुरु झाल्यास त्याची गती मंदावलेली असल्याने दिवस वाया जात असल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेवक नदूं म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. एवढे दीवस ही समस्या भेडसावत असूनही राज्य शासनाचे याकडे लक्ष का नाही असा सवाल त्यांनी केला.डोंबिवलीतील पीअँडटी कॉलनीमधील तर्टे प्लाझा येथे आॅनलाइन रजिस्ट्रेशनचे काम चालते. त्या ठिकाणी ५ केंद्र असून त्या सर्व केंद्रांमध्ये कमीअधिक प्रमाणात ही समस्या भेडसावत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. यावर तोडगा काढला जावा, अशी मागणी नागरिकांनी केली.सूत्रांच्या माहितीनुसार दिवसाला ६० हून अधिक नोंदणीची कामे या ठिकाणी केली जातात. पण अनेक दिवसांपासून सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे काम करायचे तरी कसे असा सवाल त्रस्त नागरिकांनी केला. म्हात्रे म्हणाले की, पुणे, नाशिक आदी विविध ठिकाणांहून या ठिकाणी नागरिक येत असतात. त्यांना ही समस्या भेडसावल्यास त्यांचा दिवस वाया जातो. नोंदणीसाठी जी फी आकारली जाते ती तर घेतली जातेच, पण त्यासोबत होणारा मनस्तापाचे काय? दिवस वाया जातो, वेळ वाया जातो, आणि नागरिकांना त्याचा भुर्दंड का असा सवालही त्यांनी केला.सातत्याने ही समस्या भेडसावत असते. त्यामुळे अनेकांना खोळंबून रहावे लागते. सर्व्हर डाऊन होण्याची समस्या तातडीने सुटावी यासाठी कोणते विशेष प्रयत्न प्रशासनाने केले आहेत का याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
डोंबिवलीतील घरांच्या रजिस्ट्रेशनचे सर्व्हर डाऊन, लिंक न मिळाल्याने नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 7:20 PM