कल्याण : कोविड सेंटरमधील रुग्णांच्या वस्तू चोरीस जाणे, महिलांचा विनयभंग होणे या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र होळीच्या पूर्वसंध्येला शनिवारी डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड सेंटरमधील कर्मचारीच सेंटर परिसरात दारू, गांजाची पार्टी करीत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दारू, गांजा पिण्यास मज्जाव करणाऱ्या तरुणाने त्यांचा व्हिडिओ काढला. त्या रागातून कर्मचाऱ्यांनी त्या तरुणालाच बेदम मारहाण केली आहे. दरम्यान, दारू, गांजा पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले आहे.
डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड सेंटर मनपाने एका कंत्राटदारास चालविण्यास दिले आहे. या सेंटरनजीक तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या एका शेडमध्ये काही कर्मचारी दारू, गांजा पार्टी करीत असल्याची बाब राजू आलम या तरुणाच्या लक्षात आली. राजू हा एसी दुरुस्तीचे काम करतो. त्याने दारू, गांजा पिणाऱ्या कर्मचाऱ्यांना दारू पिण्यास मज्जाव केला. ते दाद देत नसल्याने त्याने त्यांचा व्हिडिओ काढला. त्यामुळे त्यांनी राजूलाच बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे कोविड सेंटरमधील गैरप्रकार उघडकीस आला आहे. ही बाब कळताच कोविड सेंटर प्रशासनाने दारू, गांजा पिणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र, कोविड सेंटर परिसरात एखादा गैरप्रकार घडत असल्यास त्यावर देखरेख ठेवून तो रोखण्याची जबाबदारी मनपाच्या सुरक्षायंत्रणेची आहे. सेंटरमधील कामाची वेळ संपल्यावर कर्मचाऱ्यांना आवाराच्या बाहेर काढले जाते, असे सेंटर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
कोविड सेंटर चालकास समज
मनपाच्या आरोग्य विभागाने खुलासा केला आहे की, हे कर्मचारी कंत्राटदाराचे आहेत. मनपाशी त्यांचा काही संबंध नाही. संबंधित कर्मचाऱ्यांची ड्युटी संपली होती. हा प्रकार रुग्णालयाच्या मागच्या बाजूस घडला आहे. असे अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी कोविड सेंटर चालकास समज देण्यात आली आहे.
---------------