डोंबिवली : पूर्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला क्रीडासंकुलानजीक असलेल्या बंदिश पॅलेस चौकात पुन्हा गळती लागली आहे. त्यामुळे सतत पाणी वाहत असल्याने तेथे खड्डा निर्माण झाला आहे. त्यात वाहने आदळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डोंबिवली पूर्वेला ११०० मिलिमीटरच्या मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिनीद्वारे जलकुंभ भरण्यात येतात व नंतर शहराला पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिनीला बंदिश पॅलेस चौकात मागील वर्षी जुलैमध्ये एका भरधाव ट्रकची धडक बसली होती. त्यामुळे येथील जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तुटला होता. त्यामुळे काही तासांत लाखो लीटर पाणी वाया गेले होते. दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा चालू करण्यात आला. परंतु, त्यानंतरही सातत्याने पाणीगळती होत होती. ती थांबवण्यासाठी तीन ते चार वेळा पाणीपुरवठा विभागाला शटडाउन घ्यावे लागले होते.दरम्यान, आता गुरुवारपासून पुन्हा तेथेच पाणीगळती होत आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. हे पाणी साचून तेथे मोठा खड्डाही पडला आहे. पाऊस आणि जलवाहिनीतील पाणी त्यात साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहने आदळत आहेत. रात्रीच्या वेळी फार मोठी पंचाईत होते. दुचाकी, रिक्षा या सारख्या लहान वाहनांच्या अपघाताची भीती असल्याचे नागरिकांनी सांगितले.पाऊस थांबल्यावर दुरुस्तीयासंदर्भात ‘फ’ प्रभागाचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज म्हणाले, तेथे पाणीगळती थोड्या प्रमाणात होत आहे. पाऊस थांबल्यानंतर जलवाहिनीची दुरुस्ती केली जाईल. जेथे खड्डा पडला आहे, तेथे बांधकाम विभागाला सांगून तत्काळ खडी टाकण्यात येईल.
डोंबिवलीत मुख्य जलवाहिनीला पुन्हा गळती; खड्ड्यामुळे अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 2:26 AM