डोंबिवली : संततधार पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. त्यामुळे लोकल विलंबाने धावणार, याची डोंबिवलीकर प्रवाशांना खात्री होती. घडलेही तसेच... लोकल नेहमीप्रमाणे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होती. पण, सोमवारी स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला, तो डोंबिवली लोकलच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या उत्साहवर्धक कार्यक्रमामुळे. यानिमित्त अनेकांनी आपण २५ वर्षांपूर्वीच्या लोकल प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.डोंबिवली स्थानकातून लोकल सुटावी, यासाठी कापसे यांनी मध्य रेल्वेच्या डीआरएम, जीएम आदींसह रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने येथील वस्तुस्थितीचा अभ्यास करत या स्थानकातून १९९४ साली लोकल सोडली होती. दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, माजी खासदार आनंद परांजपे आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदींनीसुद्धा या स्थानकातून जास्तीतजास्त लोकल सुटाव्यात, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच आजमितीस डोंबिवली स्थानकातून दिवसाला सीएसएमटी, दादरच्या दिशेने ३२ अप आणि ३२ डाउन अशा एकूण ६४ लोकल सोडण्यात येतात. फलाट क्रमांक-२ वरूनच सगळ्या लोकल सुटतात. त्यातील पाच लोकल अर्धजलद आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी १५ डब्यांची जलद लोकल या स्थानकातील फलाट-५ वरून सोडण्यात आली. दररोज सुमारे साडेचार लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करणाऱ्या या स्थानकातून सकाळी गर्दीच्या वेळेत जास्त लोकल सोडण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांची असून, ती अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या स्थानकातून लेडिज स्पेशल लोकल सोडण्यात यावी, ही मागणीदेखील कागदावरच आहे. कल्याणप्रमाणेच पुणे, नाशिककडे जाणाºया दोन लांब पल्ल्यांच्या गाड्या येथेही थांबाव्यात, हीदेखील मागणी असून त्याची पूर्तता अद्याप झालेली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. स्थानकामध्ये विशेष सुविधा नाहीत. २०१२ नंतर या ठिकाणी एस्केलेटर आणि अलीकडे लिफ्टची सुविधा मिळाली; पण स्थानकात फलाट क्रमांक-३, ४ आणि ५ वर एस्केलेटरची सुविधा नसल्याने, ती व्हावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. या मागण्यांचे स्मरण प्रवाशांनी चव्हाण यांना करून दिले. चव्हाण आणि डोंबिवली पॅसेंजर्स असोसिएशनच्या संकल्पनेतून डोंबिवली लोकलचा रजत जयंती सोहळा दिमाखात संपन्न झाला. सकाळी ७.१५ वाजता सुटणाºया डोंबिवली लोकलच्या मोटारमन, गार्ड चव्हाण यांना शाल, श्रीफळ देत यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला. त्यानंतर, पाचही फलाटांमध्ये प्रवाशांना पेढे वाटून चव्हाण यांनी त्यांच्या अडीअडचणीही जाणल्या. आपणही एक सामान्य डोंबिवलीकर असल्याचे सांगत त्यांनी सकाळच्या ७.२९ च्या डोंबिवली लोकलमधून प्रवाशांसमवेत प्रवास केला. लोकलच्या वाढदिवसामुळे स्थानकातील फलाटांमध्ये स्वच्छता ठेवण्यात आली होती.या सोहळ्यासाठी शहराचे प्रथम नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, रा.स्व. संघ परिवाराचे मधुकर चक्रदेव, डोंबिवली पॅसेंजर असोसिएशनचे भालचंद्र लोहकरे, भाजपचे पूर्व, पश्चिम मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर, प्रज्ञेश प्रभुघाटे, सुरेश पुराणिक, जिल्हा सरचिटणीस नंदू परब, शशिकांत कांबळे, ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले, मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, निलेश म्हात्रे, विद्या म्हात्रे, मनीषा धात्रक, बाळा पवार, राहुल गवाणकर, अमित टेमकर, मुकेश सिंघानी, सुशील भावे, पूनम पाटील, नीशा कबरे, पवन पाटील आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.मान्यवर व्यक्तींच्या चित्रफलकाचे लोकार्पणया सोहळ्यानिमित्त डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवली शहर घडवणाºया ९० व्यक्तिमत्त्वांच्या चित्रफलकाचे लोकार्पण करण्यात आले.त्यामध्ये सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असून ज्यांना डोंबिवलीकरांचा अभ्यास करायचा असेल, अशा नवोदितांनी शहराच्या पश्चिमेला असलेल्या रेल्वेच्या संरक्षक भिंतीला बाहेरच्या दिशेने चित्रफलक लावले आहेत.या चित्रफलकांवर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, गणितज्ञ, सांस्कृतिक वारसा जपणाºया महनीय व्यक्ती, संरक्षण खात्यात मोलाची कामगिरी बजावलेल्यांची माहिती, रेल्वेत उल्लेखनीय कार्य केलेल्यांची माहिती अशा विविध क्षेत्रांत कार्य केलेल्यांची माहिती देण्यात आली आहे.
डोंबिवली लोकल झाली २५ वर्षांची!; प्रवाशांनी जागवल्या रामभाऊ कापसेंच्या स्मृती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 12:29 AM