डोंबिवली - येथील एमआयडीसी फेज २ मधील आशापूरा मंदिर परिसरामध्ये विविध कंपन्यांचे रसायनमिश्रीत पाणी रस्त्यावरून गटारात जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील नागरिक शशिकांत भास्कर यांनी ही समस्या असल्याचे सोशल मीडियावर टाकल्याने त्यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर त्या परिसरातील एमआयडीसीचे चेंबर फुटल्यामुळे ते पाणी बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले.आधीच एमआयडीसी परिसरातील नागरिक प्रदुषणाच्या समस्येमुळे हैराण असतांनाच या घटनेमुळेही नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. दिवसभर तेथून पाणी बाहेर पडत होते, आणि बाजुच्या गटारात जात होते. उन्हाचा तडाका वाढल्याने त्या पाण्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरली होती. दोन दिवसांपासून हा प्रकार घडला असून रात्रीच्या वेळेत दर्प वाढत असल्याचे सांगण्यात आले. चेंबर जरी फुटलेले असले तरी एमआयडीसी अथवा प्रदूषण महामंडळ विभागाच्या संबंधितांनी त्यावर तातडीने उपाययोजना करत त्या तुटलेल्या चेंबरची दुरुस्ति करण्याची आवश्यकता होती, पण तसे काही झाले नसल्याचे सांगण्यात आल्याने रहिवाश्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
डोंबिवली एमआयडीसीमधील कारखान्यांचे रसायनमिश्रीत पाणी गटारात, दुर्गंधीने नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 5:02 PM