लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवली औद्योगिक वसाहतीची (एमआयडीसी) स्थापना १९६४ मध्ये झाली, तेव्हा या परिसरात नागरीकरण झालेले नव्हते. त्यावेळी ग्रामपंचायतीचा कारभार आसपास सुरू होता. नागरीकरण झाले नसल्याने, त्यावेळी काही धोका नव्हता. मात्र, ३४७ हेक्टर इतकी जमीन संपादित करण्यात आली होती. यापैकी बहुतांश शेतजमीन होती. त्यामुळे या परिसरात आता शेतीच शिल्लक नाही. डोंबिवली एमआयडीसी आता नागरीकरणाने वेढली गेली आहे.
डोंबिवली एमआयडीसीला लागूनच सोनारपाडा, दावडी, माणगाव, मानपाडा, सागाव, आजदे, सागर्ली आदी गावे आहेत. त्यावेळी हा ग्रामीण भाग होता. या ग्रामीण भागातील शेतजमीन बाधित झाली होती. डोंबिवली एमआयडीसीचे दोन फेज असून, त्यात ४२० कारखाने आहेत. त्यात टेक्सटाइल, फार्मा, इंजिनिअरिंग, रासायनिक कारखान्यांचा समावेश आहे.
डोंबिवली एमआयडीसीत इंडस्ट्रीयल टाऊनशीप करण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो होऊ शकला नाही. त्याचबरोबर इंडस्ट्रीयल क्लस्टरचाही प्रयत्न झाला असून, तोही कागदावरच आहे. डोंबिवली एमआयडीसीचा भाग हा कधी नगरपरिषदेत, कधी महापालिकेत, तर कधी महापालिकेतून वगळून पुन्हा महापालिकेत समाविष्ट केला गेला. सरकारच्या या धरसोड वृत्तीचा फटका उद्योग मालकांना बसला. या औद्योगिक विभागाच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित केलेले आहेत. कारखान्यांना आगी लागण्याच्या घटनांसह होणारे स्फोटही या एमआयडीसीकरिता नित्य नियमाची बाब झाली आहे.
----------------
बफर झोन राहिला नाही
डोंबिवली एमआयडीसीतील दोन्ही फेजभोवती नागरी वस्ती आहे. नागरी वस्ती आणि उद्योग यांच्यात बफर झोन राहिलेला नाही. प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे ही बाब प्रकर्षाने उघडकीस आली. धोकादायक कारखाने स्थलांतरित करण्याची मागणी होऊ लागली. प्रोबेसनंतरही काही कारखान्यात स्फोट झाले तरी सुरक्षिततेच्या बाबतीत सरकारी यंत्रणा ढिम्म आहे. काही कारखान्यांमध्ये वर्षभरात भीषण आगीच्या घटना घडतात. त्यासाठीही कोणतीही ठोस उपाययोजना नाही.
---------------
नवे उद्योग आले नाहीत
१९६४ मध्ये सुरू झालेल्या औद्योगिक क्षेत्रात टप्प्याटप्प्याने भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यावर जे आहेत, तेच उद्योग सुरू आहेत; मात्र त्यानंतर नवे उद्योग आले नाही. याउलट असलेलेच काही उद्योग बंद पडले. न्यायालयीन खटले, कामगारांचे प्रश्न, आर्थिक डबघाई या कारणामुळे उद्योग बंद पडले. ‘प्रीमिअर’सारखी मोठी कंपनी बंद पडली. त्या जागेवर आता मोठे गृहसंकुल उभारले जात आहे. मोदी सरकारच्या काळात इन्स्पेक्टर राज संपुष्टात आले असले तरी नवे उद्योग आले नाहीत. मधल्या काळात काही उद्योग स्थलांतरित होतील, असे सांगण्यात येत होते.
------------------
रोजगार मिळतोय
१. मी इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले आहे. मी एमआयडीसीत दोन-तीन कंपन्यांमध्ये अर्ज केला होता. त्याठिकाणाहून मला प्रतिसाद मिळाला. ज्या कंपनीत बऱ्यापैकी पगार मिळेल तेथील नोकरी स्वीकारणार आहे.
- सुरेश आकडे
२. मी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनमध्ये माझ्या हाताला काम नव्हते. मात्र अनलॉकनंतर मला एका कंपनीतून कामासाठी बोलावणे आले आहे. डोंबिवली एमआयडीसीतील फार्मा कंपनीतून कॉल आला आहे.
- जालिंदर कांबळी
३. मी आयटी विभागाशी संबंधित कोर्स केला आहे. माझ्या हाताला काम नाही;मात्र एका मित्राच्या शिफारशीनुसार एका कंपनीत काम मिळण्याची शक्यता आहे. तेथे प्रयत्न करीत आहे.
- सुजय बनसोडे
--------------
डोंबिवली एमआयडीसीची स्थापना-१९६४
औद्योगिक क्षेत्रफळ-३४७.८८ हेक्टर
भूखंड-१५२८
एकूण कारखाने-४२०
-----------------