ठाणे: डोंबिवलीतील शैलेंद्रसिंह शेखावत (२७, रा. जयपूर, राजस्थान) याचा खून करुन १२ वर्षांपूर्वी पसार झालेल्या राजकुमार राजावत (६२, रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्यप्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट एकच्या पथकाने १५ एप्रिल रोजी अटक केली. मध्यप्रदेश विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) मदतीने चंबळ या अत्यंत संवेदनशील परिक्षेत्रातून ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.शैलेंद्रसिंह काही पैशांच्या मोबदल्यामध्ये सुशिक्षित तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे काम करीत होता. डोंबिवलीतील नरेंद्रसिंग राजावत (मुुळ रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्यप्रदेश) आणि पिंटूसिंग राजावत (मुुळ रा. मध्यप्रदेश)यांच्याकडूनही त्याने परदेशात नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले होते. परंतू, त्यांना त्याने नोकरीही लावली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाही. याच कारणावरुन नरेंद्रसिंग, पिंटूसिंग, राजकुमार आणि रिषी डॅग यांनी आपसात संगनमत करुन शैलेंद्रसिंह याचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह शालीमध्ये गुंडाळून तो नाल्यामध्ये फेकून पलायन केले होते. त्यानंतर याप्रकरणी खून करुन पुरावा नष्ट केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध २१ मार्च २००७ रोजी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या खूनानंतर सर्व आरोपी पसार झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कलम २९९ नुसार १३ मे २००८ रोजी पुराव्यानिशी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. आरोपींचा शोध घेऊनही ते पोलिसांना गुंगारा देत असल्यामुळे २ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यायालयाने त्यांच्यांविरुद्ध कलम ८७ प्रमाणे जाहीरनामा काढला होता. त्याच अनुषंगाने ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यातील फरारी आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खबऱ्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने या तपासाला सुरुवात केली. फरार आरोपी राजकुमार हा मध्यप्रदेशातील भिंड जिल्हयातील महेंदवा या त्याच्या मुळगावी असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, हवालदार आनंदा भिलारे, सुनिल जाधव, शिवाजी गायकवाड आणि सुभाष मोरे आदींच्या पथकाने मध्यप्रदेशातील चंबळ या गुन्हेगारीसाठी कुख्यात असलेल्या खोºयात प्रत्यक्ष १५ दिवस मुक्काम करुन सापळा लावला. स्थानिक भिंड जिल्हयातील असवाल पोलिसांसह एसटीएफचीही यावेळी मदत घेण्यात आली. अखेर राजावत याला १५ एप्रिल रोजी या पथकाने ताब्यात घेतले. हवालदार आनंदा भिलारे यांची कामगिरी मोलाची ठरल्याचेही देवराज यांनी सांगितले. राजावत याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या इतरही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डोंबिवलीतील खूनाच्या गुन्हयातील फरारी आरोपीला १२ वर्षांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 7:15 PM
मध्य प्रदेशातील चंबळ या अत्यंत संवेदनशील परिक्षेत्रातून ठाणे पोलिसांनी खूनाच्या गुन्हयात पसार असलेल्या राजकुमार राजावत याला अटक केली. २ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यायालयाने त्याच्यासह चौघा आरोपींविरुद्ध कलम ८७ प्रमाणे जाहीरनामाही काढला होता.
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईचंबळ खोऱ्यात १५ दिवस सापळा लावून घेतले ताब्यातपोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते आदेश