अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवलीमुंबईसह ठाणे, नवी मुंबईत रिक्षांना मीटरसक्ती असतानाही डोंबिवलीत मात्र गेल्या दोन वर्षांपासून रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू होता. त्याला चाप बसविण्यासाठी कल्याण आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी येथे प्रवाशांना पाहिजे असल्यास मीटर सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रिक्षा संघटनांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही सक्ती चालकांना करण्यात येत असल्याने महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवाशांना पहिल्या टप्प्यासाठी २० रु. मोजावे लागणार आहेत. या उपक्रमाला १५ दिवसांपूर्वीच सुरुवात झाली होती. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे उद्या (मंगळवार) पासून पुन्हा त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रिक्षा संघटनेचे दत्ता मळेकर, शेखर जोशी यांच्यासह नाईक यांनी त्यांच्या ताफ्यासह शहराच्या पूर्वेकडील रामनगर, भाजीमार्केट या परिसरात भेट देत प्रवाशांशी संपर्क साधून त्या ठिकाणीही मीटरने प्रवासाची मुभा असल्याचे सांगून जनजागृती केली. आगामी काळात कोणत्याही रिक्षाचालकाने जर प्रवासाचे भाडे नाकारल्यास तसे कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या प्रवाशांना शेअर पद्धतीने प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी वेगळी रांग लावण्यात येईल, तसेच मीटरसाठी वेगळी रांग असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याणमधील प्रीपेड रिक्षाला अशा पद्धतीने प्रवासाला मात्र अल्प प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सर्वेक्षणानंतर स्पष्ट केले. डोंबिवलीत मात्र तसा अनुभव येणार नसल्याचा विश्वास संघटनेच्या वतीने काळू कोमास्कर यांनी स्पष्ट केला. ज्या रिक्षाचालकांचे मीटर कार्यरत नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे ते कार्यरत आहे, परंतु तरीही भाडे नाकारल्यास मात्र होणारी कारवाई नेमकी कोणी करावी, याबाबत संभ्रम असल्याची माहिती मिळाली. शासनाच्याच अन्य दुसऱ्या विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्याबाबतची निश्चिती होत नसल्याने संभ्रम असल्याचे ते म्हणाले. डोंबिवलीकर प्रवाशांनी त्यास सहकार्य करावे. नागरिकांच्या माहितीसाठी ठिकठिकाणी बोर्ड लावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
आजपासून डोंबिवलीत रिक्षांना मीटरसक्ती!
By admin | Published: July 21, 2015 4:47 AM