डोंबिवली: ‘आरंभ प्रतिष्ठान’ हे ढोल ताशा व लाठी काठी पथक असून गेली ५ वर्षे डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने आपल्या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात विविध स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा ठसा उमटवल्यानंतर राज्याच्या सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या सांस्कृतिक नगरित २७, २८ जानेवारी रोजी तालसंग्राम २०१८ ही राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धा भरविण्यात आली असून त्या स्पर्धेला युवकांच्या जल्लोषात शनिवारी शुभारंभ होणार आहे.स्पधेर्साठी डोंबिवलीसह मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, कल्याण आदी ठिकाणांमधून १४ पथक सहभागी झाली आहेत. त्यात प्रामुख्याने शिवसुत्र-बदलापूर, पार्लेस्वर-विलेपार्ले, कलारंग प्रतिष्ठान-डोंबिवली, माऊली ढोल ताशा पथक- डोंबिवली, शिवस्वरूप-भिवंडी, आम्ही कांदिवलीकर-कांदिवली, अभिनव स्वरगर्जना-पनवेल, रुद्र -ठाणे, शुवसुत्र-नाहूर, शिवाजीनगर-भिवंडी, अविष्कार-वसई, उत्सव-खारघर आदी दिग्गज पथकांचा समावेश आहे. त्यास्पर्धेला परिक्षक म्हणुन या क्षेत्रातील प्रख्यात जाणकार गणेश गुंड, स्वानंद ठाकूर,सुजित सोमण रा. रमणबाग, तसेच निलेश कांबळे-रणवाद्य,व विजय साळुंखे-शिवगर्जना, पुणे येथून लाभले आहेत.या स्पर्धेत विजयी होणा-या ढोलपथकांना प्रथम पारितोषिक रुपये १ लाख ५० हजार, द्वितिय रुपये १ लाख, तृतिय क्रमांकासाठी ५० हजार रुपयांचे पारितोषिक संस्थेने जाहिर केले आहे. तसेच उत्कृष्ठ ढोल, ताशा, टोल, ध्वजधारीं यांसाठीही प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक, तसेच सहभागींसाठीही विशेष तरतूद करण्याचा संस्थेने केली आहे. त्यासह विजेत्या पथकांना आकर्षक ट्रॉफी तसेच सहभागींसह सगळयांनाच सन्मानपत्र, देण्यात येणार आहे. डोंबिवली शहरातही सुमारे १६ पथक ढोल ताशा पथक आहेत. त्या सगळयांसाठी महावादन करत डोंबिवलीत आलेल्या बाहेरगावच्या ढोलपथकांचे शानदार स्वागत केले.आरंभ प्रतिष्ठान संस्थेमार्फत भरवण्यात येणा-या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा सांस्कृतिक संचालनालय, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, शांतीरत्न प्रतिष्ठान , सैनिकी शिक्षण महाविद्यालय-खडवली आदींसह शहर वाहतूक विभाग, डोंबिवली, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे स्वच्छता महासर्व्हेक्षण २०१८ या सगळयांचे प्रमुख सहकार्य लाभले.२७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सुरु झालेल्या या स्पर्धेच्या शुभारंभाला उद्घाटक महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समितीचे सभापती राहुल दामले, डोंबिवली विभागाचे पोलिस एसीपी रवींद्र वाडेकर, माजी नगरसेवक राजन मराठे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, साई शेलार, राजू शेख, प्रज्ञेश प्रभुघाटे, मनोज घरत आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तर २८ जानेवारी रविवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मनसे नेते राजू पाटील, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार जगन्नाथ शिंदे आदी मान्यवर समारोपासाठी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.