डोंबिवली : माऊलीचा अश्व, पखवाज, आणि तीन ते चार हजार वारक-यांच्या साक्षीने भव्य रिंगण सोहळा उद्या (दि.20) रंगणार आहे. धर्मराज फाऊंडेशनतर्फे भरविण्यात येणा-या आगरी-कोळी महोत्सवात हा रिंगण सोहळा रंगणार आहे. या महोत्सवाची सुरूवात भव्य वारकरी रिंगणाने होणार आहे. महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीनंतर डोंबिवलीत प्रथमच भव्य वारकरी रिंगण सोहळा होणार आहे. 21 ते 27 नोव्हेंबर या कालवधीत आगरी कोळी महोत्सव संत सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुलात भरविण्यात येणार आहे. या महोत्सवाची सुरूवात 21 नोव्हेंबरला श्री विठ्ठलमंदीर संतवाडा, आयरे रोड ते सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलपर्यंत भव्य दिंडी काढून करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 वाजता माऊलींच्या अश्वासह वारकरी रिंगण सोहळा क्रीडासंकुलात होईल. या रिंगणात 555 पखवाज, माऊलीचे 2 अश्व असणार आहेत. तसेच 70 दिंडय़ा काढण्यात येणार आहे. आळंदी, पंढरपूर, मुंबई, रायगड, ठाणे, डहाणू, शहापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड येथील वारकरी येथे रिंगणात सहभागी होणार आहेत. संत सावळाराम महाराजांचे डोंबिवली हे जन्मस्थान आहे. त्यांनी आमच्या समाजाला घडविले. त्यांच्या विषयी आदर व्यक्त व्हावा , सावळाराम महाराज आणि वासुदेव महाराज यांनी केलेली अध्यात्मिक क्रांती संपूर्ण महाराष्ट्राला कळावी आणि आगरी-कोळी महोत्सव हा केवळ मनोरंजनासाठी राहू नये म्हणून रिंगण सोहळा आयोजित केल्याचे संस्थेचे जयेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी माऊली ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्य़ातील वंश परंपरागत चोपदार प.पू. बाळासाहेब रणदिवे (चोपदार), संत श्रेष्ठ तुकोबारायांचे वंशज पं.पू. पुंडलिक महाराज देहूकर उपस्थित राहणार आहेत.
डोंबिवलीत उद्यापासून आगरी-कोळी महोत्सवाची धूम, पंढरपूरनंतर डोंबिवलीत भव्य वारकरी रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 6:03 PM