डोंबिवली: डोंबिवली हे घाणेरडं शहर आहे. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण झालं आहे, रस्ते अरुंद आहेत. नेतेमंडळींनी अनेक बेकायदा बांधकाम केली आहेत. मात्र, या सर्व परिस्थितीला नागरिक जबाबदार आहेत, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.डोंबिवलीतील एका कार्यक्रमात गडकरी यांनी वेबीनॉरच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला. यावेळी एका तरूणीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी डोंबिवली हे अत्यंत घाणेरडे शहर असल्याचे म्हटले. गडकरी म्हणाले की, सरकारकडून मेट्रो रेल्वे, जल वाहतूकीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच विविध रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. या सगळ्याचा योग्यरित्या उपयोग करून टिटवाळा, माळशेज या भागात स्मार्ट व्हिलेजची निर्मिती होणे गरजेचे आहे. डोंबिवलीत शहरातील समस्या भयानक आहेत. साक्षात परमेश्वर आला तरी या समस्या सुटणार नाहीत. तरीदेखील भाजपा सरकार त्यावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही महापौरांच्या मागे का लागत नाही? रस्त्यांचे जाळे विणले की प्रगती होते. ज्याठिकाणी रस्ते होतात तिथे टाऊनशिप होतात, इंडस्ट्री आणि महाविद्यालयं येतात. त्यामुळे स्मार्ट शहर आकाराला येते. तुमच्या शहरातील 8 टक्के प्लॅस्टिक डांबरीकरणात टाकू शकता. भारत सरकारतर्फे त्यांचे नोटिफिकेशन लावले आहे. आता हे औपचारिक झाले आहे. तुमच्या येथील महिला बचतगटाच्या माध्यमातून प्लॅस्टिक गोळा करा. डांबराचा भाव 45 रूपये इतका आहे. प्लॉस्टिकचा दर 1 रूपये किलो आहे. महापौरांना विश्वासात घ्या. कल्याण-डोंबिवलीतील 8 टक्के प्लॉस्टिक डांबरात टाकल्यावर येथील प्लॅस्टिकचा प्रश्न सुटेल. पर्यावरणाच्यादृष्टीने हा चांगला निर्णय ठरेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या महापौरांकडे पाठपुरावा केला पाहिजे, असे गडकरी यांनी सांगितले.