डोंबिवली : केडीएमसीकडून आठवडाभरापासून सुरू असलेल्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक आक्रमक पवित्रा घेत महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली. रेल्वेस्थानक परिसरातील १५० मीटरच्या बाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातही कारवाई केली जात आहे, असा आरोप यावेळी फेरीवाल्यांनी केला. दरम्यान, डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांना यावेळी मध्यस्थी करावी लागली.एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला आहे. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी डोंबिवलीत होत नसल्याचे चित्र नेहमी पाहावयास मिळते. मात्र, महापौर विनीता राणे यांच्या आदेशानुसार, सध्या जोमाने कारवाई सुरू आहे. पण, ही कारवाई १५० मीटरच्या बाहेरही सुरू असल्याचा आरोप फेरीवाल्यांचा आहे. मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या फेरीवालाविरोधी पथकाची कारवाई सुरू असताना फेरीवाले आक्रमक झाले. त्यांनी थेट महापालिकेचे विभागीय कार्यालय गाठले. याबाबतची माहिती मिळताच वाडेकरही तेथे दाखल झाले. यावेळी त्यांनी फेरीवाल्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनीही फेरीवाल्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तर, १५० मीटरच्या बाहेर बसणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाई करू नये. मात्र, १५० मीटरच्या आत फेरीवाले बसले असल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे वाडेकर यांनी कुमावत यांना सांगितले.यावेळी पश्चिमेतील काही फेरीवाले नियमानुसार व्यवसाय करत असतानाही त्यांचे तराजू तोडल्याची घटना घडल्याचे कांबळे यांनी वाडेकर यांना सांगितले. मात्र, कुमावत यांनी सावध पवित्रा घेतला. महापालिकेची कारवाई योग्य पद्धतीने सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, तणावाची परिस्थिती बघता या प्रश्नावर केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके हेच तोडगा काढू शकतात. त्यामुळे केडीएमसी मुख्यालयात जाऊन तेथे दाद मागावी. येथे आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वर्तन करू नये, अन्यथा आम्हालाही कारवाई करावी लागेल, अशी तंबी वाडेकर यांनी यावेळी दिली. त्यानंतर तणाव शांत झाला.पोटासाठी व्यवसाय करणे हा आमचा हक्क नाही का? ४० वर्षांपासून आम्ही व्यवसाय करत आहोत. तरीही आम्हाला त्रास का देता, असा सवाल महिला फेरीवाल्यांनी केला. कारवाई करताना सामान जप्त केल्यास, ते तेथेच दंड आकारून सोडावे, अशी मागणी फेरीवाल्यांनी केली. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी तसाच फतवा काढला होता, असे कांबळे यावेळी म्हणाले. तसेच, बोडके यांनी सोमवारी दिलेल्या आश्वासनानुसार, आॅगस्ट अखेरीस आम्हाला महापालिकेने जागा न दिल्यास आम्ही शांत बसणार नाही, याची नोंद महापालिका आणि पोलिसांनी घ्यावी, असा इशारा कांबळे यांनी दिला.कारवाई सुरूच ठेवाफेरीवाल्यांनी महापालिकेत धाव घेतल्याचा प्रकार कुमावत यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना फोनद्वारे कळवला. त्यावेळी फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवा. फेरीवालाविरोधी पथकाला कारवाईदरम्यान पुरेसे पोलीस बळ उपलब्ध करून दिले जाईल, असे बोडके यांनी कुमावत यांना सांगितले. फेरीवालाविरोधी पथकाचे मनोधैर्य खचू नये, यासाठी हा निर्णय बोडके यांनी घेतला आहे.
डोंबिवलीत फेरीवाले झाले आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:18 AM