अनिकेत घमंडी / डोंबिवलीपूर्वेतील श्रीखंडेवाडीतील २७ शालेय विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्र येत स्वयंम स्फूर्तीने ‘आपला कट्टा’ हे वाचनालय सुरू केले आहे. या उपक्रमासाठी प्रत्येकाने स्वत:कडील तसेच घरोघरी जाऊन विविध पुस्तके गोळा केली. विशेष म्हणजे, त्यांनी आर्थिक मदतीऐवजी पुस्तके देण्याचा आग्रह धरला. वाचन, मैदानी व परंपरागत खेळ मागे पडत असल्याची ओरड होत असतानाच विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.निकिता पिल्लाय, जीत नकराणी, रोशन सिंग, रोशनी सिंग, जागृती जैस्वाल, अपूर्वा चिपळूणकर, श्रुती पाटील, निधी खांडेकर आदी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हे वाचनालय उभे केले आहे. वाचनालयासाठी त्यांनी स्वत:कडील पुस्तके आणली. त्याचबरोबर घरोघरी फिरून पुस्तके देण्याचे आवाहन केले. त्याला श्रीखंडेवाडीतील रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. काही अबालवृद्धांनी त्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी निधी नको, पुस्तक हवे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सर्वांनाच त्यांचा हेवा वाटला. श्रीखंडेवाडीतील अमेय काटदरे, सागर घोणे, ऋषिकेश भोसले यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे त्या लहानग्यांचा आत्मविश्वास वाढवला. थोरामोठ्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे मुलेही भारावून गेली आहेत.विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबाबत घोणे म्हणाले की, मुलांना पुस्तके ठेवण्यासाठी जागेची कमतरता होती. पण त्यांचा आनंद बघून जवळच्याच एका काकांनी त्यांचे कपाट देऊ केले. आम्ही त्या मुलांना एका दुकानासमोरची जागा दिली आहे. त्या कट्ट्यावरच ते पुस्तक रचतात. सकाळी व सायंकाळी मुले तेथे जमून वाचनाची आवड जोपासतात. तसेच वाचलेल्या पुस्तकातील आवडलेला प्रसंग, गोष्ट सगळ््यांना कथन करतात. वाचनाचा आनंद ते एकमेकांशी शेअर करतात.
वाचन संस्कृती जपण्यासाठी डोंबिवलीत ‘आपला कट्टा’
By admin | Published: April 29, 2017 1:24 AM