कल्याण : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंडियन फेस्टीवल ऑफ आर्ट 2018 या फेस्टिव्हला आजपासून सुरूवात झाली आहे. या संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये 150 ते 200 कलाकार सहभाग घेणार आहेत. कल्याण-डोंबिवली, ठाणो विभागातील युवा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. फडके मैदान येथे हा महोत्सव आयोजित केला आहे. तीन दिवसीय या महोत्सवात नृत्य, अभिनय, गायन, स्किट, माईम इ. कला प्रकार सादर होणार असून चित्रकला, फोटोग्राफी, रांगोळी, पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकार श्रीधर केळकर, रांगोळीकार उमेश पाचांळ, श्रीहरी पोवळे, अभाविप कोकण प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीधर केळकर म्हणाले, या कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने सामान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या कला प्रदर्शित व सादर करता येणार आहेत. त्यामुळे हे युवकांचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. अनिकेत ओव्हाळ म्हणाले, कल्याणच्या इतिहासात प्रथमच अशा मोठय़ा आर्ट्स फेस्ट कार्यक्रमाचे आयोजन होत असून यातून युवकांना प्रेरणा मिळेल. तसेच कल्याण डोंबिवलीचा सांस्कृतिक वारसा जपण्यात या कार्यक्रमांची मदत होईल, असे सांगितले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी फोटोग्राफी प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात कल्याण-डोंबिवलीतील 300 कलाकरांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वाईल्ड लाईफ, कोकणातील जीवनमान आणि स्थानिक भागातील विविध स्पर्धा, क्रीडा व सांस्कृतिक ओळख या प्रदर्शनातून करून देण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ मध्ये पक्षी व प्राण्यांची अंदाजे 100 छायाचित्रे लावण्यात आली आहेत. बुलढाणा सातारा या परिसरातील अभयराण्यातून ही छायाचित्रे काढण्यात आली आहेत. रांगोळी स्पर्धेसाठी कोणताही विषय देण्यात आला नव्हता. हौशी 12 कलाकारांनी रांगोळी साकारली आहे. त्यामध्ये अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथील कलाकार सहभागी झाले होते. स्त्रीभूण हत्या यासारखे सामाजिक संदेश रांगोळीतून देण्यात आले. तर चित्रकला स्पर्धेत प्रदूषित पाणी, मुलगी वाचवा, जागतिक शांतता हा विषय घेतले आहेत. या स्पर्धेत 25 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
कला महोत्सवात 24 जानेवारीला नाटक, नृत्य,माईण्ड या स्पर्धा होणार आहेत. नृत्य व अभिनय या स्पर्धेच्या ऑडिशन्स पूर्ण झाल्या असून निवडले गेलेले स्पर्धक, मुख्य कार्यक्रमात आपली कला सादर करतील.