डोंबिवली : ‘दाम करी काम देवा’ हे शब्द आता केवळ गाण्यासाठी मर्यादित राहिले नसून, जीवनात पैसा किती महत्त्वाचा आणि मोलाचा आहे, याचा ठायीठायी अनुभव येत आहे. त्यासाठी नियोजन आणि त्यानुसार गुंतवणुकीची अंमलबजावणी केली नाहीतर मात्र पंचाईत होऊ शकते. गुंतवणुकीचे अनेक प्रकार असून विशेषत: महिला त्याबाबत जास्त सतर्क असल्याचे दिसून येते. पूर्वीपासून आताच्या विज्ञानयुगातील महिला ही बचत कशी करावी, याचा मूलमंत्र देऊ शकते. परंतु, केवळ माहिती आणि आत्मविश्वास तसेच रिस्क घेण्याची तयारी नसल्याकारणाने देशभरातील अल्प प्रमाणातील महिलाच उद्योगांत, व्यवसायांत यशस्वी होतात. गुंतवणुकीसाठी शेअर्ससह म्युच्युअल फंड हादेखील उत्तम पर्याय आहे. त्याचे महत्त्व डोंबिवलीकर महिलांनी जाणून घेतले. निमित्त होते, लोकमत सखी मंचच्या माझ्या ‘मनी’च्या गोष्टी या उपक्रमाचे.डोंबिवली पूर्वेच्या सर्वेश हॉलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी सखींनी ‘लक्ष्मी माहात्म्य’ जाणून घेतले. सखींना मार्गदर्शन करण्यासाठी एनएसडीएलतर्फे कंपनीचे उपाध्यक्ष (व्हीपी) मनोज साठे आले होते. त्यांनी महिलांना गुंतवणुकीबाबतचे महत्त्व विशद करून दिले. एका व्यक्तीने ३५ वर्षांपूर्वी सुमारे १० हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते, त्याची व्हॅल्यू आजमितीस सुमारे ६०० करोड एवढी असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. हे तुम्हीही करू शकता, परंतु केवळ थोड्याशा मार्केटमधील अप/डाऊनने खचून न जाता ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हा मूलमंत्र जोपासावा. शेअर्समध्ये पैसा टाकताना एनएसई आणि बीएसई यांचे संकेतांक काय सांगतात, याचा अभ्यास करा. तसेच थोडेच पैसे असतील तर म्युच्युअल फंडात ते गुंतवा. परंतु, बचत करताकरता ती वाढीस कशी लागेल, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दीपाली केळकर यांनी सखींशी हितगुज साधताना उपस्थितांकडून त्यांच्या गुंतवणुकीच्या पद्धती जाणून घेतल्या. त्या वेळी कोणाला गाणी म्हणायला सांगितले, तर गमतीशीर किस्से सांगितले. त्यामुळे वातावरणात उत्साहासह चैतन्याचे वातावरण होते. पूर्वीच्या काळी राजा-प्रजा अशी पद्धत होती. त्या वेळचे कष्ट आणि आताच्या कामाच्या पद्धतींमधील बदल तसेच तेव्हाचे धन आणि आताचा पैसा यामधील फरक त्यांनी शेअर केला. वैभवाच्या संकल्पना कशा बदलत गेल्या, तसेच आध्यात्मिक उपासना कार्यात ‘लक्ष्मी’ व्रताची वाढती लोकप्रियता, झटपट पैसा अशा विविध टप्प्यांमधून ‘मनी’च्या गोष्टींची चर्चा करण्यात आली. ‘आता कशाला उद्याची बात’ हे वाक्यदेखील गाण्यापुरतेच मर्यादित असून ‘आता उद्याचीच पहिली बात’ असा कानमंत्र सांगत त्यांनी सखींना गुंतवणूक करा. न केल्यास काय होते, याचेही अनेक दाखले दिले. ‘इन्सान कहता है की पैसा आये तो मै कुछ करके दिखाऊ ! लेकिन... पैसा कहता है की तु कुछ करके दिखाए तो मैं आता हूँ’ या व्हॉट्सअॅपवरील एका कवितेच्या चारोळीने त्यांनी समारोप केला. सखी लक्ष्मी वेशभूषा स्पर्धेला उदंड प्रतिसाद : याच निमित्ताने सखी लक्ष्मी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत गृहलक्ष्मी, वरदलक्ष्मी, लक्ष्मी, स्मार्ट लक्ष्मी अशी लक्ष्मीरूपे दर्शविणारी विविध रूपांत महिलांनी वेशभूषा केली होती. तांबे, चांदी, सोने, अॅल्युमिनिअमसह विविध नाण्यांच्या साहाय्याने नथ, बाजुबंध, कर्णफुले, लक्ष्मीहार, पाटल्या, अंगठी, वेणीमाळ, गोफ, कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले होते. सहभागींमधील सहा सखींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये मनीषा चितळे (प्रथम), तृप्ती कापडणे (द्वितीय), स्रेहल मानकर (तृतीय) तर अनिता पावसकर, मेधा मोरे, शीतल नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तसेच डोंबिवलीतील ‘मंजिरी’ या साड्यांचे व्यापारी हसमुख शहा यांच्या वतीने लकी ड्रॉ काढून पैठणीही सखीला देण्यात आली. एकूण आलेल्या सखींपैकी १८ क्रमांकाची नोंद असलेल्या माधवी देसाई या सखीला ड्रॉ लागण्याचा मान मिळाला आणि केशरी रंगाची पैठणीही मिळाली. त्या वेळी सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट आणि जोश-उत्साहाचे वातावरण होते. या वेळी लोकमत ठाणेचे सहायक उपव्यवस्थापक राघवेंद्र शेट यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. टेस्टी फुडी नेटवर्क यांच्यातर्फे विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
डोंबिवलीकर सखींनी जाणले ‘गुंतवणुकीचे’ माहात्म्य!
By admin | Published: July 06, 2015 3:28 AM