- जान्हवी मोर्ये डोंबिवली : नोकरी, व्यवसाय तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांना घरी दिवाळीचा फराळ करणे जमत नाही. त्यामुळे तयार फराळ खरेदी करण्यावर त्यांचा भर आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्त परदेशात विशेषत: अमेरिकेत गेलेल्या मंडळींसाठी डोंबिवलीतील फराळविक्रेत्यांकडे आॅर्डर नोंदवली गेली आहे. यंदा फराळाच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत, अशी माहिती फराळविक्रेत्यांनी दिली आहे.फराळविक्रेते श्रीपाद कुलकर्णी म्हणाले, महागाई, वाहतूक तसेच कागदी पिशव्यांचा खर्च वाढल्याचा फटका विक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळे यंदा तयार फराळाच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळी तोंडावर आली तरी फराळाला जास्त मागणी नाही. दिवाळीच्या दोन दिवस आधी मागणी वाढू शकते. डोंबिवलीतील तयार फराळाला स्थानिक बाजारपेठेबरोबरच अमेरिकेत जास्त मागणी आहे. त्यातुलनेत दुबई व युरोपीय देशांत फराळाला मागणी कमी आहे. त्याचे कारण तेथे आता फराळाचे पदार्थ मिळत आहेत.फराळविक्रेते नाख्ये यांनी सांगितले की, चिवडा, शंकरपाळी व बेसनलाडूला जास्त मागणी आहे. मिठाईमध्ये काजूकतली, सोनपापडी आणि विविध फ्लेव्हर्सच्या मिठाईला मागणी आहे. त्यात काजू, चिकू, आंबा, चॉकलेट, अंजीर आदी १० ते १२ प्रकार आहेत.डोंबिवलीतील सुनील शेवडे यांच्याकडील फराळाला परदेशातून मागणी आहे. तेथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी आणि नोकरीसाठी गेलेल्यांना घरचा फराळ चाखता यावा, यासाठी अनेक जण शेवडे यांच्याकडील फराळ कुरिअरद्वारे तेथे पाठवत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेगळा पॅक उपलब्ध आहे. ग्राहकांच्या देखतच ते फराळाचा पॅक तयार करून देत आहेत. शेवडे यांच्याकडे कोंथिबीर चिवडा आहे. कोंथिबीर डी-हायड्रेड केली जाते. त्यामुळे तो जास्त दिवस टिकतो, असे ते म्हणाले. फराळविक्रेते सुभाष पाटील म्हणाले, चकली, अनारसे, बेसनलाडू या पदार्थांना जास्त मागणी आहे. सणाच्या तोंडावर भाववाढ केली जाते, अशी ग्राहकांची ओरड असते. त्यामुळे आम्ही भाववाढ केलेली नाही. फराळावरदेखील १२ ते २८ टक्के जीएसटी असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.२३ प्रकारचे लाडू : विक्रेते श्रीजय कानिटकर म्हणाले, रवा, बेसन, गुलकंद, बाजरी, गूळपापडी, मोतीचूर, डिंक, शिंगाडा, पौष्टिक चुरमुरालाडू असे विविध प्रकारचे २३ लाडू आमच्याकडे उपलब्ध आहेत. दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी लाडूंचा साधा पॅक, व्हरायटी पॅक आणि प्रीमियम पॅकही तयार केले आहेत. साध्या पॅकमध्ये रवा-नारळ, बेसन आणि गुलकंदी लाडू आहेत. व्हरायटी आणि प्रीमियम पॅकमध्ये सात प्रकारांच्या लाडूची चव चाखता येते. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती टिकवून ठेवण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. बंगाली मिठाईपेक्षा शरीरासाठी हे विविध लाडू पौष्टिक आहेत. दिवाळीपर्यंत लाडूंच्या पाच हजार आॅर्डर येतील, असा अंदाज आहे.
डोंबिवलीतील फराळ अमेरिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:27 AM