- मुरलीधर भवारडोंबिवली : कॅरम खेळण्यात राष्ट्रीय पातळीवर आघाडीच्या चार खेळाडूंमध्ये जान्हवी मोरे ही गणली जात होता. डिसेंबर २०१९ मध्ये जान्हवीला आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. त्याआधीच तिचा अपघाती मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे तिचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होण्याचे स्वप्न भंगले आहे. जान्हवीच्या यशाची, तिच्या स्वप्नांची कहाणी सांगताना तिचे वडील सुनील मोरे यांना अश्रू अनावर झाले.
सुनील मोरे यांनी सांगितले की, जान्हवीचा जन्म दि. २२ डिसेंबर १९९८ रोजी झाला. तिचे शिक्षण चंद्रकांत पाटकर शाळेत झाले. आम्ही घरी कॅरम खेळायचो. त्यातूनच जान्हवीला लहानपणापासून कॅरम खेळायची आवड निर्माण झाली. शाळेत तिला म्हात्रे नावाचे क्रीडा शिक्षक होते. त्यांनी तिच्यातील गुण ओळखले. गणशोत्सवात कॅरमच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यावेळी त्याठिकाण मुली व मुलांचे दोन गट खेळणार होते. मुलींचा गट त्याठिकाणी आलाच नाही. त्यावेळी मुलांच्या गटातून जान्हवीने खेळण्याची तयारी दर्शविली. तिला परवानगी दिली गेली. त्यावेळी ती त्या स्पर्धेत दुसरी आली.
ठाणे जिल्हा कॅरम असोशिएशनचे पदाधिकारी घरी आले. त्यापैकी एका पदाधिकाऱ्याने तिच्या सोबत कॅरम खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्यासोबत कॅरम खेळल्यावर त्यांना तिच्या खेळातील चमक जाणवली व तेव्हापासून तिच्या यशाला सुरुवात झाली. प्रदीप साटम आणि जितेंद्र गोसावी यांनी तिला कॅरमचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर जान्हवीने कॅरम स्पर्धेत सहभागी होण्यास सुरुवात केली. वयाच्या १२ वर्षापासून तिचा खेळ सुरु झाला. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने यश संपादन केले. तिने राष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्ण पदके, चार रौप्य पदके आणि सहा कांस्य पदके मिळवून कॅरम खेळावर आपला ठसा उमटवला होता. कॅरम खेळातील आघाडीच्या चार खेळाडूंमध्य ती गणली जात होती. तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावायचे होते.
डिसेंबर २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा होती. त्यात तिला सहभागी व्हायचे होते. आमचे सगळे कुटुंब आमच्या महाड येथील गावी गेलो होतो. शनिवार, दि. ११ मे रोजी आम्ही परतलो. घरी येतानाच जान्हवीने मला स्पर्धेचा सराव सुरु करायचा आहे, असे सांगितले. १२ मे रोजी घरी तिने तिचा सहकारी अक्षय पिंपुटकर याला बोलावून घेतले होते. पिंपुटकर हाही कॅरम खेळाडू असल्याने दोघांनी सराव केला. पाच वाजता सराव आटोपून दोघेही लोढा सर्कल येथे आले असता रस्ता ओलांडत असताना जान्हवीला टँकरने धडक दिली. तिचे आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न भंगले. कॅरमवरची कुठली सोंगटी कशी जिंकायची हे जान्हवीला बरोबर कळत होते. मात्र नियतीच्या बोर्डावरील सोंगट्या अशा काही फिरल्या की, आमची जान्हवी तिची स्वप्न अर्धवट टाकून डावावरुन उठून गेली... बोलता बोलता मोरे यांचा कंठ दाटून आला...भाऊ हर्षल करणार आपल्या बहिणीचे स्वप्न पूर्ण...जान्हवी कॅरम खेळत असल्याने तिच्यापासून प्रेरीत होऊन तिचा लहान भाऊ हर्षल हा कॅरम खेळत होता. त्याने जिल्हा पातळीवर हा खेळ खेळला आहे. तो मॉडेल कॉलेजात इयत्ता १२ वीचे शिक्षण घेत आहे. त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर, असे आम्ही सांगत होतो. मात्र त्याची ताई जान्हवी ही खेळ अर्ध्यावर सोडून निघून गेली. त्यामुळे तिचे आंतरराष्ट्रीय खेळाडून होण्याचे स्वप्न हर्षल पूर्ण करणार असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.नाव कमावणारी प्रामाणिक खेळाडू....स्पर्धांसाठी वयोगट असतात. दोन दिवसांच्या अंतरामुळे वय स्पर्धेच्या निकषात बसत नसेल तर त्या स्पर्धेत सहभागी होण्यास जान्हवीला रस नसे. ती स्वत:च माघार घेत होती. तिचा हा प्रामाणिकपणा आणि चांगला खेळ पाहून बँक आॅफ इंडियाने तिला क्रीडा स्कॉलरशीप दिली होती. डोंबिवलीत तिला दोन वेळा क्रीडा रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.तिचा कॅरमबोर्ड सोंगट्यांविना...जान्हवी ज्या कॅरमबोर्डवर स्पर्धेचा सराव करीत होती. तो कॅरमबोर्ड तिच्या घरातील हॉलमध्ये ठेवलेला होता. त्यावर आज एकही सोंगटी नव्हती. त्या सोंगट्यांना लीलया बोर्डावरुन चार कोनांचा रस्ता दाखवणारीच नसल्याने सगळ््या सोंगट्या शांत झाल्या अन बोर्डही नि:शब्द झाला आहे.