- राजू ओढे ठाणे : एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मलेशियात अपहरण झालेल्या डोंबिवलीच्या वैद्यबंधूंची शुक्रवारी सुखरूप ‘घरवापसी’ झाली. वैद्यबंधूंच्या कंपनीत असलेल्या एका भागीदाराने फिलिपाइन्सच्या एका कंपनीची ५० हजार डॉलर्सने फसवणूक केली. या फसवणुकीत वैद्यबंधंूचा हात असल्याच्या गैरसमजातून त्यांचे अपहरण केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.डोंबिवलीत राहणाऱ्या कौस्तुभ आणि रोहन वैद्य या दोन भावांची रॉक फ्रोझन फूड नावाची कंपनी असून विदेशात मासेपुरवठा करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायानिमित्त मलेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांत त्यांचे जाणेयेणे असते. काही दिवसांपूर्वीच वैद्यबंधूंच्या रॉक फ्रोझन फूड्स कंपनीला मलेशियातील मिस ली फ्रोझन फूड्सकडून व्यवसायाकरिता फोन आला. फोन आणि मेलवरून औपचारिक व्यवहार पूर्ण झाल्यावर उर्वरित व्यवहार पूर्ण करण्यासाठी रोहन आणि कौस्तुभ १ आॅगस्ट रोजी मलेशियाला गेले. २ आॅगस्ट रोजी त्यांचे वडील प्रकाश वैद्य यांना कौस्तुभने घाबरलेल्या आवाजात फोन केला. एक कोटी रुपयांसाठी आपले अपहरण केल्याचे त्याने वडिलांना सांगितले. प्रकाश यांनी लगेचच या प्रकरणाची तक्रार डोंबिवलीतील स्थानिक रामनगर पोलिसांकडे केली. त्यानंतर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मलेशियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेतली. यादरम्यान कौस्तुभच्या बँक खात्यातून २५ हजार रुपये काढण्यात आल्याने कुटुंबीयांची चिंता आणखी वाढली होती. ६ आॅगस्ट रोजी रात्री अपहरणकर्त्यांनी वैद्यबंधूंची सुटका केली. मलेशियन पोलिसांची चौकशी आटोपल्यानंतर शुक्रवारी वैद्यबंधू मायदेशी परतले.ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी वैद्यबंधूंना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. पोलिसांनी त्यांची विचारपूसही केली. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार, वैद्यबंधूंच्या रॉक फ्रोझन फूड कंपनीमध्ये केरळ येथील एक व्यावसायिक भागीदार आहे. त्याने फिलिपाइन्स येथील एका कंपनीकडून मोठी आॅर्डर घेतली होती. त्यापोटी त्याने ५० हजार डॉलर्स कंपनीकडून घेतले होते. प्रत्यक्षात मालाचा पुरवठा मात्र केलाच नाही. फिलिपाइन्स येथील कंपनीने वैद्यबंधूंच्या रॉक फ्रोझन फूडची माहिती घेतली असता कौस्तुभ आणि रोहन वैद्य हे या कंपनीचे मालक असल्याचे समजले. ते मलेशियामध्ये आले असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर, या कंपनीने हस्तकांच्या मदतीने दोघा वैद्यबंधूंना मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालालंपूर येथे व्यवसायाची चर्चा करण्याच्या बहाण्याने बोलवून त्यांचे अपहरण केले. २ ते ६ आॅगस्टदरम्यान त्यांना सिंगापूर येथील एका दुर्गम भागातील इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये डांबण्यात आले होते. त्यांना अपहरणकर्त्यांनी मारहाणही केली. मात्र, कौस्तुभ आणि रोहन वैद्य यांनी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यावर त्यांचा विश्वास बसला. शिवाय, दरम्यानच्या काळात मलेशियाच्या दूतावासानेही माहिती काढून अपहरणकर्त्यांशी संपर्क साधला. दूतावासातून फोन आल्यानंतर अपहरणकर्त्यांची घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी वैद्यबंधूंची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.>भागीदाराने केली होती फसवणूकरॉक फ्रोझन फूड कंपनीमध्ये केरळचा एक व्यावसायिक भागीदार आहे. त्याने फिलिपाइन्स येथील एका कंपनीकडून मोठी आॅर्डर घेतली होती. त्यापोटी त्याने ५० हजार डॉलर्स कंपनीकडून घेतले होते. प्रत्यक्षात मालाचा पुरवठा मात्र केलाच नाही. फिलिपाइन्सच्या कंपनीने माहिती काढल्यावर त्यांना डोंबिवलीच्या वैद्यांविषयी कळले. कंपनीने व्यवसायाच्या बहाण्याने हस्तकांच्या मदतीने दोघांना क्वालांलंपूरला बोलवून अपहरण केले.
डोंबिवलीच्या वैद्यबंधूंची सुखरूप ‘घरवापसी’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 5:47 AM