डोंबिवली: गुढीपाडव्याच्या दुस-या दिवशी परंपरेप्रमाणे येणा-या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंति उत्सवानिमित्त डोंबिवलीत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या नांदीवलीसह रामनगर येथिल मठामध्ये दान दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने केले आहेत. पहाटेपासूनच निघालेल्या पालखीतून स्वामी नामाचा गजर करण्यात आला. स्वामींच्या जयघोषाने रामनगर, दत्तमंदिर चौक, सुनिलनगरचा परिसर दुमदुमून निघाला होता.मंडळाच्या माध्यमातून साज-या केल्या जाणा-या उत्सवाचे हे ३४ वे षर्व असून त्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतून भक्त येतात. कै.सद्गुरु भालचंद्र(अण्णा) लिमये यांनी १९७४ मध्ये या मंडळाची स्थापना केली होती. तेव्हापासून रामनगर येथिल गणेश कृपा आणि त्यापाठोपाठ गोविंदानंद श्रीराम मंदिर ट्रस्ट या ठिकाणी स्वामी जयंति साजरी केली जाते. १९९९ पासून मंडळाने नांदीवली येथे एका मोठ्या जागेमध्ये स्वामींचा मठ बांधला, त्यामुळे परिसरालाही स्वामी समर्थ नगर असे नाव पडले.आता त्या मठाची ख्याती सातासमुद्रापार असून मंडळातर्फे वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रम केले जातात. मंडळाच्या संस्थापिक सुषमा लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली आता या मंडळाचे कार्य अव्याहतपणे सुरु आहे.शेकडो अनुयायांनी या मंडळाचे कार्य पुढे नेण्यासाठी आम्ही चालवू हा पुढे वारसा अशी मनाशी खुणगाठ बांधली आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर सेवेकरी वृंदावन या ठिकाणी बघायला मिळतो. येथे विनामूल्य सेवा करणारे सेवेकरी असून केवळ स्वामी सेवेसाठी ते कार्यरत असल्याचे सांगण्यात येते.याच मंडळाच्या माध्यामाने रामनगर येथे देखिल श्री गोविंदानंद श्रीराम मंदिर ट्रस्ट या संस्थेने राम मंदिराचे जीर्णोद्धार कार्य हाती घेतले आहे. आता ते मंदिर पूर्णत्वाकडे जात असून लवकरच तेथेही मुर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा उपक्रम संपन्न होणार आहे.नांदीवली मठामध्ये १९ व २० मार्च या दोन दिवसांच्या भरगच्च उपक्रमामंध्ये स्वामींच्या निर्गुण पादुकांची पालखी, पूजन, स्वामी धून, नीत्योपासना, मानस पूजा यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. दोन्ही दिवस मठामध्ये येणा-या प्रत्येक भक्ताला महाप्रसादाची व्यवस्था असते. स्वामींच्या गाभा-यात मंडळाच्या श्रीराम मंदिराचे कार्यवाह हरिश्चंद्र गोलतकर हे सुंदर आरास साकारतात. यंदा हिंदू धर्मामध्ये सांगण्यात आलेली शुभचिन्हे गाभा-यांत स्वामींभोवती लावण्यात आली आहेत. या शुभचिन्हांचे थोडक्यात महत्व विषद करण्याचा प्रयत्न केला आहे.या दोन दिवसांमध्ये भजन, किर्तन, संगीतसंध्या आदी उपक्रमांचेही आयोजन करण्यात येते. स्वामींच्या संगीत सेवेमध्ये मंडळाचे अनुबोध आणि पुरुषोत्तम भजनी मंडळ देखिल सेवा सादर करतात. मंगळवारी मंडळाच्या प्रथेप्रमाणे सकाळी ११ वाजता ‘आईचा जोगवा’ मागण्यात येणार असून त्यावेळी स्वामींचे आदीमाया आदीशक्ती हे रुप बघण्यासारखे असते. डोंबिवलीसह पंचक्रोशीतील शेकडो महिला ते रुप बघण्यासाठी आणि जोगव्याचे तांदुळ घेण्यासाठी मठामध्ये प्रचंड गर्दी करतात. वर्षानूवर्षे परंपरेनूसार सुरु असलेला हा मठ आता ठाणे जिल्ह्याचे आकर्षण झाला असून प्रती अक्कलकोटचे स्वरुप त्यास येत आहे.याखेरीज शहरात पश्चिमेलाही कोपर रोड, संतोषी माता मंदिर नजीक स्वामींच्या मठामध्ये विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. तेथे देखिल अनेक भक्त आवर्जून दर्शनासाठी जातात. नीत्योपसना, मनोभावे सेवा करतात. अशा पद्धतीने डोंबिवली शहरात स्वामी समर्थ नामाची धून म्हणण्यात डोंबिवलीकर दंगुन जातात.
डोंबिवलीत स्वामी समर्थ जयंति उत्साहात : स्वामी नामाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 9:32 AM
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंति उत्सवानिमित्त डोंबिवलीत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या नांदीवलीसह रामनगर येथिल मठामध्ये दान दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने केले आहेत. पहाटेपासूनच निघालेल्या पालखीतून स्वामी नामाचा गजर करण्यात आला. स्वामींच्या जयघोषाने रामनगर, दत्तमंदिर चौक, सुनिलनगरचा परिसर दुमदुमून निघाला होता.
ठळक मुद्दे नांदिवलीसह रामनगरच्या स्वामींच्या मठात उत्सव पश्चिमेलाही स्वामींची धून-उत्सव