भिवंडी : जिल्ह्यातील वज्रेश्वरी व गणेशपुरी या सुप्रसिध्द तिर्थक्षेत्राच्या परिसरांत नववर्षाच्या पुर्वसंध्येस ठिकठिकाणी छापे टाकून गावठी दारूचे कॅन व देशी-विदेशी दारूच्या बाटल्या ठाणे ग्रामिण पोलीसांनी जप्त केल्या.या घटनेने वज्रेश्वरी व गणेशपुरी परिसरांत खळबळ माजली आहे.ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथील देवीचे मंदिर व गणेशपुरी येथील स्वामी नित्यानंद महाराजांंची व मुक्तानंद महाराजांची समाधी या श्रध्दास्थानामुळे जिल्ह्यात वज्रेश्वरी व गणेशपुरी या स्थानाला शासनाने तिर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे.असे असताना गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याचे या मोहिमेत आढळून आले आहे.ठाणे ग्रामिण अधिक्षक कार्यालयांतील विशेष पथकाने अचानक नववर्षाच्या पुर्वसंध्येला रविवारी ही कारवाई केल्याने परिसरांतील अवैधरित्या दारूविक्री करणाºयांना चाप बसला आहे.अकलोली व गणेशपुरी या परिसरांत गरम पाण्याचे कुंड असल्याने या ठिकाणी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. त्याच प्रमाणे नववर्षाच्या निमीत्ताने येथील मंदिरात दर्शनासाठी भाविक जमले होते. मात्र फिरण्यासाठी आलेले पर्यटक या भागात नेहमी मांसाहारासह मद्यपान करीत असतात. त्यासाठी अनेकवेळा येथील लॉजचा उपयोग केला जातो. बाहेरून आलेले पर्यटक अनेक लॉजमध्ये अवैधरित्या मद्यपान करताना आढळून येतात. याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयास मिळाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या निमीत्ताने कोणतेही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीसांची विशेष मोहिम राबवून परिसरांतील गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई केली आणि दारूचे अड्डे नष्ट केले. कोपर्डी हत्याकांडानंतर शासनाने राज्यातील गावठी दारूचे उत्पादन व विक्रीवर कडक निर्बंध आणले आहेत. त्यामुळे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी नेमलेल्या विशेष पथकाने ठिकठिकाणी धाड टाकून १०५ लिटर गावठी दारू, ४९ देशी दारूच्या बाटल्या, ६९ विदेशी मद्याच्या बाटल्या, ८ बियरच्या बाटल्या असा एकूण २३ हजार ३९८ रूपयांचा दारूसाठा जप्त केला.तसेच अवैधरित्या गावठी दारूची विक्री करणारे गुरु नाथ जाधव याच्या विरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गणेशपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांवर आद्याप कारवाई न झाल्याने परिसरांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.