पालघर : पालघर तालुक्यातील ५२ ग्रामपंचातीचा निकाल सोमवारी घोषीत होऊन शिवसेना व बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहील्याचे दिसून आले असून सेनेने ३६ ग्रामपंचायतीवर तर बविआने १५ ग्रामपंचायतीवर आपला दावा केला आहे.पालघर तालुक्यामध्ये झालेल्या मतदाना दरम्यान एकूण ७२.१९ टक्के मतदान झाले होते. आज ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी पालघरमधील जीवनविकास शिक्षण संस्थेच्या स. तु. कदम हायस्कूलमध्ये झाली. यावेळी निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. प्रथम २३ ग्रामपंचायतीच्या पहिल्या प्रभागाची मतमोजणीला सुरूवात झाली. यादरम्यान मतमोजणीसाठी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी वेळीच उपस्थित राहत नसल्याने ही मतमोजणी दुपारी ३ वाजेपर्यंत चालली.या निवडणुकीत ५२ पैकी ३६ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असल्याचा दावा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी केला असून पास्थळ, परनाली, दुर्वेस, सावरा इ. ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व मिळविताना, दांडी, घिवली, तारापूर, करगाव, कुंडण, वंगणी, परनाळी, अंबाडी, शेलवली, हालोली, वसरे इ. ग्रामपंचायतीवर सेनेच भगवा झेंडा फडकल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीने सफाळे, दहीसर, तर्फे मनोर, गांजे-ढेकाले या ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवून कमारे, मनोर, पडघे, तारापुर, घाटीम, महागाव, नंडोरे, तांदुळवाडी, सोनावे, बिरवाडी, किराट इ. १५ ग्रामपंचायतीवर आपला दावा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केला आहे.मान ग्रामपंचायतीमध्ये दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यानी चिठ्ठी उचलून उमेदवाराला विजय घोषीत करण्यात आले तर कमारे ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवाराला नोटापेक्षा (११६ मते) कमी मते (९३) मते मिळाली. त्या उमेदवाराला विजयी घोषीत करण्यात आले. पोलीसांनी पालघर-बोईसर रस्त्यावरील वाहतुक सुरळीत सुरू ठेवून कुठेही अनुचीत प्रकार होणार नाही यासाठी मेहनत घेतली. (प्रतिनिधी)
पालघरवर सेनेचे वर्चस्व
By admin | Published: April 22, 2016 1:46 AM