ठाणे: वाहतूकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वत:बरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे, हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असा सल्ला ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बुधवारी दिला.
ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता. यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुंबरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, वेगवेगळया घटकांच्या माध्यमातून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आले. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागाने वर्षभर राबविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हेल्मेट असते, तर दोन दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यूही टळला असता. अगदी सिटबेल्ट लावणे, हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणे, सिग्नल न तोडणे, दुचाकी चालवितांना मोबाईलवर न बोलणे असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.
तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्याथ्यार्र्बरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचे महत्व जाणले पाहिजे. विद्यारथ्यार्ंनीच लाडीकपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्याने पाळला जाऊ शकतो, असेही डॉ. चव्हाण म्हणाले. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरात दहा टक्के म्हणजे १७ हजार मृत्यू आणि ५० हजार जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, गुन्हे शाखेचे डॉ. पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे आणि गणेश गावडे आदी उपस्थित होते. वाहतूक नियम पाळण्याबाबत उद्बोधन करणारी एक स्क्रीप्टही यावेळी ‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुले आणि चेतना भट या कलाकारांनी सादर केली. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी प्रस्तावना करुन वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले. तर सहायक आयुक्त अनिल घेरडीकर यांनी आभार व्यक्त केले.
असे झाले बक्षीस वितरण
वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आयोजिलेल्या पोस्टर स्पर्धेत प्रथम राज सावंत (अंबरनाथ), द्वीतीय अलिफिया अन्सारी (श्रीरंग, ठाणे) आणि तृतीय वेदांत कोचरे (श्री माँ बालनिकेतन) तर रिल्स स्पर्धेत श्रेयस पांचाळ, विवेक यादव आणि ऋषिकेश पाटील हे विजेते ठरले. त्याचबरोबर फोटोग्राफीमध्ये रोहित मालेकर, आर्या अंबुरे आणि रंजन किणी यांनी बक्षीस मिळवले.