ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. तेव्हा मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंना सतत फोन करत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. दिल्लीप्रमाणे राज्यातही आदित्य ठाकरे नावाचा पप्पू तयार झाला असून त्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'मातोश्री' वर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला असतानाच त्यांच्यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पलटवार केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी आणि कष्टकरी जनतेचे अश्रू पुसणारे आहेत, घरात बसून रडणारे नाहीत तर रडवणारे आहेत, असेही ते म्हणाले.
शिंदे यांना कशासाठी नोटीस येईल, वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी सर्व नेत्यांना बाजूला ठेवून ही बैठक घेतली होती. नोटिसा आल्या म्हणून पंतप्रधानांसमोर रडले होते, असा गौप्यस्फोट म्हस्के यांनी केला आहे. तुमच्या मित्रांच्या परदेशात कुठे कुठे कंपन्या आहेत आणि कुठे कुठे गुंतवणूक केली, याबाबत आम्हाला माहिती आहे. ते उघड करायला लावू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संजय राऊत यांच्याप्रमाणेच आदित्य यांना मानसिक आजार झाला आहे. जी गोष्ट घडली नाही, ती त्यांना घडल्यासारखी वाटते. त्यामुळे त्यांना उपचाराची गरज आहे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. उंदीर बिळात लपतात, तसे घरात कोण लपले होते, हे सर्व राज्याला माहिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली. संजय राऊत हे दुतोंडी गांडूळ आहेत. त्यांचे एक तोंड मातोश्रीकडे तर दुसरे तोंड सिल्व्हर ओककडे असल्याची टिकाही नरेश म्हस्के यांनी केली.