कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड
By अजित मांडके | Updated: February 20, 2025 21:19 IST2025-02-20T21:19:06+5:302025-02-20T21:19:58+5:30
"आज त्या दोन मुली, त्याची पत्नी रडत आहे, त्या दोन मुलींचा शाप लागेल अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे नाव न घेता टिका केली..."

कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड
ठाणे : मी कोणाचा खुन केला नाही, मी कोणाला आत्महत्या करायला भाग पाडले नाही, मात्र पुन्हा परमार आणि जमील शेक होऊ देऊ नका किंबहुना कोणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका अशी कळकळीची विनंती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. आज त्या दोन मुली, त्याची पत्नी रडत आहे, त्या दोन मुलींचा शाप लागेल अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे नाव न घेता टिका केली.
ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंब्य्रातील नेते शमीम खान याला सुध्दा त्रास दिला जात आहे. कधी दुबईवरुन, कधी इनकम टॅक्स तर कधी ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. स्वत:च्या स्वार्थासाठी आणि आव्हाडाला अडकविण्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला आत्महत्या करायला भाग पाडू नका अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाला सुनावले. मला अडकावयचे असेल तर मी तयार आहे, करा माझ्या संपत्तीची खुली चौकशी असे थेट आव्हानही त्यांनी दिले. जमील शेखच्या हत्याचा तपास पुन्हा सुरु करा, त्याचा तपास हिम्मत असेल तर नितीन ठाकरे या पोलीस अधिकाºयाकडे द्या असे आव्हानही त्यांनी केले.
आज महापालिकेत कोणतेही पद नसताना कॅबीन वापरली जात आहे, त्यासाठी पालिकेचे कर्मचारी जुंपलेले असता, हे महापालिका आयुक्तांना दिसत नाही का? असा सवाल करीत शहर विकास विभागात जायचे सर्वांच्या कुंडल्या काढायच्या आणि त्यांना घाबरविण्याचे काम करायचे एवढेच काम शिल्लक राहिले आहे. केवळ आपल्याला आमदार व्हायचे आहे, म्हणून धमकावून, घाबरवून स्वत:च्या गटात घेण्याचे घाणेरडे राजकारण केले जात असून हे अजित पवार यांना दिसत नाही का? असा सवालही त्यांनी केला.
ठाणे जेलमध्ये हत्याच्या आरोपीला जेवण आणि फोन -
ठाणे जेलमध्ये हत्येचा आरोपी असलेल्याला फोन आणि जेवण पुरविले जात आहे. जेलमधील कॅटींग देखील राबोडीतील एक जण चालवत असून त्याच्याकडूनच या सुविधा पुरविल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असतांना त्यांनी देखील याला सहकार्य केले होते. परंतु त्यांच्या कदाचित हे लक्षात आले नसेल की तो आज एक भस्मासुर झाला असल्याची टिकाही त्यांनी केली.