ठाणे: वाहतूकीचा नियम तोडल्यानंतर जुगाड करण्याची धावपळ केली जाते. परंतू, असे जुगाड करणे म्हणजे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे वाहतूकीचे नियम पाळा अपघात टाळा, असे आवाहन ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी केले. तंत्रज्ञानाचा आणि नियमांचा वापर केल्याने ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील ३५ ब्लॅकस्पॉटची संख्या २५ वर आली. याठिकाणी अपघातांच्या वाढत्या संख्येने मृत्यूचेही प्रमाण वाढले होते. त्यामुळे एकही ब्लॅकस्पॉट असता कामा नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन केले आहे. ठाण्यातीलटिपटॉप प्लाझामध्ये यानिमित्त आयोजित कार्यक्रमात या अभियानाचे उद्घाटन झाले. यंदाच्या अभियानाचे बोधवाक्य 'निर्णय तुमचाच जबाबदारीही तुमचीच' असून यावेळी मार्गदर्शन करतांना डुंबरे बोलत होते. यावेळी यावेळी सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.वाहतूकीबाबत रिक्षाचालक, व्यापारी आणि स्थानिक रहिवाशी यांच्या काही उपाययोजना असतील. त्या फार तांत्रिक नसल्या तरी या उपाययोजनांचा विचार करावा, असेही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचवले.
दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होत असल्याने रस्ता सुरक्षा विषय गांभीयार्ने घेणे अपेक्षित आहे. मात्र, चालकाचे काहीतरी चुकते आणि अपघात होतो. जुगाड करण्यामध्ये भारत प्रसिद्ध असून नियम तोडल्यानंतर वाहतूक पोलिसाला मॅनेज करण्याचा वेगळाच जुगाड असतो. मात्र, असा जुगाड एखादयाच्या जिवावर बेततो. त्यामुळे आपण मानसिकतेमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
तर, वाहतूकींच्या नियमांबाबत शाळकरी मुलांमध्ये जनजागृती करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. त्यासाठी महापालिका आणि पोलिस विभागाने एकत्रितरित्या काम केले पाहिजे. अशा पद्धतीने दंडात्मक कारवाई केली पाहिजे की, कोणाची नियम तोडण्याची हिम्मत होणार नाही. उलट दिशेने वाहन चालविणाऱ्याच्या वाहनाचे टायर पंक्चर झाले पाहिजेत. याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. किमान वाहतूकीचे नियम पाळून सिग्नल न तोडण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अपघातांच्या चित्रफिती दाखविणार-रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत ठाणे शहरात बाइक रॅली आयोजित केली आहे. तसेच, रिल्स, छायाचित्रण, पोस्टर स्पधार्ही आयोजित केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. नियम ताेडणाऱ्या १८ ते २२ वयाेगटातील तरुणांना त्यांच्या परिवारासह एकत्र बोलवून त्यांना काही अपघातांच्या चित्रफिती दाखवविणार आहे. याचा परिणामकारक प्रभाव पडण्यासाठी त्यांचे समुपदेशनही केले जाईल, असेही राठोड म्हणाले. लघुपटाच्या माध्यमातून वाहतूकीबाबत जगजागृती केली जाणार असून सोमवारी एका लघुपटाचे अनावरण करण्यात आले.